लसीसाठी भल्या पहाटे ज्येष्ठांच्या केंद्रांवर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:08+5:302021-05-05T04:36:08+5:30
सांगोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भयभीत झालेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांकडून लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे सांगोला शहर व तालुक्यात ...
सांगोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भयभीत झालेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांकडून लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असल्यामुळे सांगोला शहर व तालुक्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. याउलट गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला लसीकरणासाठी भल्या पहाटेपासूनच लसीकरण केंद्रांवर रांगेत उभ्या राहतात. मात्र, लसच उपलब्ध नसल्यामुळे हिरमुसलेल्या चेहऱ्याने सकाळी घराकडे परतावे लागत आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासकीय नोकर, ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाकडून आत्तापर्यंत सांगोला शहर व तालुक्यातील सुमारे १५,८९५ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला गेला आहे. शासनाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस अनिवार्य केली आहे. सध्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार आहे, याची माहिती फलकावर लावावी. जेणेकरून त्याचदिवशी नागरिक लसीकरणासाठी हजर राहतील, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी केली आहे.
कोट :::::::::::::::::::
आत्तापर्यंत सांगोला शहर व तालुक्यातील १५,८९५ नागरिकांना लसीकरण केले आहे. सध्या लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असून, पुरवठा कमी आहे. तरीही लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांच्याकडे ४ हजार डोसची मागणी केली आहे.
- डॉ. सीमा दोडमनी
तालुका वैद्यकीय अधिकारी, सांगोला
फोटो ओळ ::::::::::::::::::
सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पहाटे ४ वाजल्यापासूनच रांगा लावत आहेत.