Good News; बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट जमा होणार इतकी रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 08:59 AM2020-04-25T08:59:45+5:302020-04-25T09:01:21+5:30
एजंटगिरीला नाही थारा: भूलथापांना बळी न पडण्याचे बांधकाम कामगारांना आवाहन
सोलापूर : कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या कामगारांच्या खात्यावर लवकरच दोन हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त नीलेश यलगुंडे यांनी दिली.
'कोरोना' विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे इमारत व इतर बांधकामे बंद झाली आहेत. बांधकामावर काम करणाºया नोंदणीकृत व सक्रीय (जीवीत) बांधकाम कामगारांना सध्या दररोज कोणतेच काम नसल्याने त्यांची रोजंदारी बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन गरजांची तजवीज करताना अडचणी निर्माण होत आहेत. सद्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही रक्कम मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांनाच आणि त्यांच्या बँक खात्यावर थेट दिली जाणार आहे.
कामगारांनी नोंदणी करताना जे बँक खाते दिले आहे, त्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. ही रक्कम घेण्यासाठी कामगारांना कोणतीही कागदपत्रे जमा करायची नाहीत. त्यामुळे कोणी कागदपत्रे द्या, रक्कम मिळवून देतो असे सांगत असेल तर अशा एजंट, संघटनेच्या लोकांपासून सावध रहावे किंवा याबाबत पोलीस किंवा सहायक कामगार कार्यालयास कळवावे असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यलगुंडे यांनी केले आहे.