चांगली बातमी; जातीवाचक गावं अन् वस्त्या आता महापुरुषांच्या नावांनी ओळखणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:46 PM2021-07-28T16:46:26+5:302021-07-28T16:46:32+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय : ग्रामविकास विभागाला सूचना
सोलापूर :जिल्ह्यामध्ये जातीवाचक नावांची गावे, वस्त्या, रस्ते आहेत. जातीवाचक नावे बदलून महापुरूषांची किंवा लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपद्धती शहरात नगरविकास विभागाने तर ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाने निश्चित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारच्या बैठकीत केली.
जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलणे संदर्भातील आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, मनपाचे नगर अभियंता संदीप कारंजे, मोहोळचे गटविकास अधिकारी गणेश मोरे, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी आर.बी. देसाई, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक बी.एम. स्वामी यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
नावे बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव त्वरित जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याचे निर्देशही शंभरकर यांनी दिले. जातीवाचक वस्त्या, रस्ते, गावांची नावे बदलण्यासाठी यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.