Good News; सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमीच; नगरपालिकांमुळे फुगली आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:14 PM2020-08-12T12:14:09+5:302020-08-12T12:16:51+5:30
आजपासून अहवालाचे त्रिभाजन; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांचे स्पष्टीकरण
सोलापूर : ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या मानाने कोरोनाचा संसर्ग कमीच आहे, पण नगरपालिका हद्दीत वाढलेल्या आकडेवारीमुळे जिल्हा परिषद सदस्यांचा गैरसमज झाला, असे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सोमवारच्या सभेत सदस्यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. यावर बोलताना सीईओ वायचळ म्हणाले की, ग्रामीण भागाची लोकसंख्या २८ लाख आहे. त्यात नगरपालिका व नगरपरिषदांची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर आहे. पण त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कोरोना महामारीच्या काळात मदत म्हणून ही सर्व जबाबदारी पेलत आहे. अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, करमाळा, माळशिरस, माढा, मोहोळ, मंगळवेढा या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पण ही आकडेवारी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होत असल्याने कोरोना संसर्गाचा आकडा मोठा दिसत आहे.
याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविल्या आहेत. चाचण्या वाढल्यामुळे आज जरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जादा दिसत असली तरी साखळी तुटल्यानंतर कोरोनामुक्तीकडे वाटचाल होणार आहे. दक्षिण सोलापूरमध्ये हे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दररोज अडीच ते तीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे दहा टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येणे हे आताच्या घडीला अपेक्षित आहे, असे वायचळ यांनी सांगितले.
बुधवारपासून अहवाल वेगळे
कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे जिल्ह्याची एकत्रित माहिती देत होते. त्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पदभार घेतल्यानंतर शहर विभागाचा अहवाल स्वतंत्र देऊ लागले. गावे आणि नगरपालिकांचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाºयामार्फत देण्यात येत आहे. पण आकडेवारीचा गोंधळ होत असल्याने बुधवारपासून जिल्हा आरोग्य आणि नगरपालिकेतील रुग्णसंख्या याची माहिती वेगवेगळी दिली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी सांगितले.
चाचण्या वाढविणार
ग्रामीण भागात पन्नास हजार रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याचे नियोजन होते. पण पंढरपूर व बार्शीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने आणखी २० हजार जादा किट मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.