Good News; कोरोनाच्या जागृतीमुळे डेंग्यू हद्दपार; वर्षभरात एकाचाही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 01:01 PM2021-02-04T13:01:35+5:302021-02-04T13:01:41+5:30
मागील दोन वर्षांत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी- कोरोनामुळे जागृतीत वाढ
सोलापूर-ः जिल्ह्यात मागील दोन वर्षांत डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० मध्ये १३२ जणांना डेंग्यू झाला होता. चांगली बाब म्हणजे, २०२० मध्ये डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नाही.
कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित रहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करण्यासाठी आरोग्य विभाग व महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांत उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत.
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग काम करत आहे. २०१९ मध्ये ७६८ संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ७५ जणांना डेंग्यूचे निदान झाले, तर एकाचा मृत्यू झाला.
महापालिकेतर्फे जुलै महिन्यापासून कंटेनर सर्व्हेक्षण सुरू आहे. यात महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली. वापरण्याच्या पाण्यात लारवा (अळी) आढळल्यास त्यात रसायन टाकण्यात आले. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मागील वर्षी ज्या परिसरात रुग्ण आढळला त्या परिसराची पाहणी करण्यात आली.
------
कुठल्यावर्षी किती रुग्ण
- २०१६ - ५७९
- २०१७ - ५५२
- २०१८ - ५६८
- २०१९ - ७५
- २०२० - १३२
डेंग्यूची लक्षणे
- - डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात.
- - अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही मुख्य लक्षणे
- - डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी
- - रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान हे हात-पाय, चेहरा व मान यावर आलेल्या पुरळांवरून केले जाते.
- - नाकातून, हिरड्यातून व गुदद्वारातून रक्तस्त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.
------
२ लाख ९७ हजार २९७ घरांना प्रत्यक्ष भेटी
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करण्यात येते. आरोग्यसेवकांकडून नागरिक साठवत असलेल्या पाण्यांची तपासणी करण्यात आली. गरज असल्यास त्यात औषधही टाकण्यात आले. २०२० मध्ये जिल्ह्यातीस २ लाख ९७ हजार २९७ घरांना भेटी देऊन पाण्याची तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे नागरिकांनी स्वताची काळजी घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वच्छतेचे महत्त्व जाणल्यामुळे यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे सहाय्यक हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.