Good News; सोलापूरच्या शसकीय रूग्णालयात कोरोनाचे २४३ रिकामे बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 12:33 PM2021-07-13T12:33:58+5:302021-07-13T12:34:05+5:30
कोविडचा भार हलका : नॉन कोविडकडे विभागात वाढले रुग्ण
सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मागील दीड वर्षांपासून येथे रुग्णांचा ओघ सुरुच होता. दीड महिन्यांपासून कोविड रुग्णसंख्या कमी झाली आहे. आता नॉन कोविड विभागात रुग्ण वाढत आहेत तर कोरोनामुळे थांबलेल्या नियमित शस्त्रक्रियादेखील करण्यात येत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सिव्हिल हॉस्पिटलवर कोरोनाबाधित रुग्णांचा भार वाढला होता तसेच नॉन कोविड विभागदेखील सुरुच होता. इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरू तर नियमित शस्त्रक्रिया थांबलेल्या होत्या. शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना भरती केले असल्याने नॉन कोविड रुग्णांची अडचण झाली होती. डोळ्यांच्या इतर नियमित (काही दिवसांनी करता येणाऱ्या) शस्त्रक्रिया ठप्प होत्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयात बाधित रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात होते. आता मात्र बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने नियमित शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे.
- शासकीय रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू - ५७
- शासकीय रुग्णालयात कोरोनाचे रिकामे बेड - २४३
दुसऱ्या लाटेतही ओपीडी सुरुच
शहरात जिल्हा रुग्णालय नसल्यामुळे रुग्णांना दुसरीकडे उपचार मिळविणे शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सिव्हिलमधील कोविड सोबतच नॉन कोविड ओपीडी सुरुच ठेवली होती. याचा नॉन कोविड रुग्णांना फायदा झाला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यापासून नॉन कोविड विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
तीन महिन्यांपासून प्रतीक्षा...
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरुच होत्या. त्यात हाड मोडणे, ॲपेंडिक्स फुटणार असेल तर, प्रसुतीसारख्या अत्यंत गरडेच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर काही दिवस टाळता येण्यासारख्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यात पिशवी काढणे (कॅन्सर नसेल तर), कुटुंब नियोजन आदींचा समावेश होता. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना औषधे देण्यात आली. मागील दीड महिन्यांपासून रूटिन शस्त्रक्रियांना सुरुवात झाली.
सध्या ४५० नॉन कोविड रुग्ण ॲडमिट
कोविडचे रुग्ण कमी झाले, प्रशासनाने लावलेले निर्बंध शिथिल केले. त्यामुळे नॉनकोविड रुग्णांची संख्या सिव्हिलमध्ये वाढत आहे. सध्या सिव्हिलमध्ये ४५० नॉन कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. इमर्जन्सीसोबतच नियमित शस्त्रक्रियाही करण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यापासून सिव्हिलमध्ये नियमित शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे. सध्या नॉनकोविडचे ४५० रुग्ण ॲडमिट आहेत. खासगी मल्टिस्पेशलिटी रुग्णालयात खर्चिक असणाऱे उपचार सिव्हिलमध्ये मोफत आणि शासनाच्या योजनेत होतात. अद्ययावत असे सर्व तंत्रज्ञान सिव्हिलमध्ये वापरले जात आहे. रुग्णांनी बाहेर खर्च करण्यापेक्षा सिव्हिलमधील सेवेचा लाभ घ्यावा.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय