Good News; सांगोला साखर कारखान्याचा येत्या हंगामापासून गळीत हंगाम सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 08:58 PM2021-09-12T20:58:07+5:302021-09-12T20:58:34+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सांगोला : मागील अनेक वर्षापासून बंद असलेल्या सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा अखेर अनेक वर्षाचा वनवास संपला. येत्या गळीत हंगामापासून साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे .
राज्य शिखर बँकेने सांगोला सा.का. लाँगलीग भाडेतत्त्वावर धाराशिव सह. साखर कारखाना प्रा.लि. चेअरमन अभिजीत पाटील यांना चालविण्यास दिला आहे. दरम्यान धाराशिव साखर कारखाना कंपनीकडून आज रविवारी सांगोला साखर कारखान्या तील स्वच्छता साफसफाईसह मशीनरीची दुरुस्ती कामे करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून ५ ऑगस्ट रोजी सांगोला सहकारी साखर कारखाना लाँगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य शिखर बँकेचे चेअरमन अनासकर, एम.डी. देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सांगोला साखर कारखाना चेअरमन दीपक साळुंखे-पाटील यांची मुंबईत संयुक्त मिटिंग होऊन सांगोला कारखाना लॉंगलीग भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
सांगोला साखर कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारील तालुक्यातील कारखान्याकडे ऊस गाळपाला घेऊन जाण्यासाठी हातापाया पडावे लागत होते. आता आपल्या तालुक्यातील कारखाना सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे, शिवाय तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे. पंढरपूर येथील डीवीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवून कर्जातून बाहेर काढण्याबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देऊन न्याय देतील असा विश्वास सांगोला कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिला आहे.