Good News; अखेर अतिवृष्टीचा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 07:15 PM2020-11-17T19:15:51+5:302020-11-17T19:16:34+5:30
मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २० कोटी जमा; मोबाईल वर मेसेज बघून शेतकरी आनंदीत
मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या .मात्र बँकांच्या सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे अडकून पडलेला निधी अखेर मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावातील तब्बल ३६ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. मंगळवारी पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे मेसेज मोबाईलवर पाहून शेतकरी आनंदित होत आहेत.
मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी १९ कोटी ९८ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने केली या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.
ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता. अतिवृष्टी व महापूराने भीमा व माण नदीकाठसह तालुक्यातील ८१ गावातील विविध पिकांना मोठा फटका बसला होता. काळया शिवारात रब्बी ज्वारी, हरभरा, सुर्यफूल, तुरी, कांदा, कडधान्य यासह ऊस , फळपिके यांचे अतीवृष्टी झाल्याने नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते .या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व तलाठी , मंडल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी मोठे परिश्रम घेतले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ८१ गावातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आला आहे .मंगळवारपासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे
- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा ठरवून शेतकऱ्यांना दिलासा दिला . आज माझ्या बँक खात्यात रक्कम जमा झाली.गतवर्षी ही महापुराने भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले मात्र मदत मिळाली नाही तरी गतवर्षीच्या मदत निधीचे अशाप्रकारे लवकर वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी