माेठी बातमी; पत्नीला आत्महत्येस भाग पाडले; पती अन् सासूला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 11:46 AM2022-02-11T11:46:23+5:302022-02-11T11:46:29+5:30
साेलापूर लाेकमत न्युज
सोलापूर : विवाहित महिलेस मारहाण व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पती दत्तात्रय राम शिवशरण याला ८ वर्षे आणि सासू चंदाबाई राम शिवशरण हिला ७ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२०१७ मध्ये लक्ष्मी सहदेव क्षीरसागर (रा. भीमनगर, पो. मंद्रुप, ता. द. सोलापूर) यांची मुलगी पूजा राम शिवशरण हिला तिचा नवरा दत्तात्रय राम शिवशरण, सासू चंदाबाई राम शिवशरण व सासरच्या लोकांनी मानसिक छळ करून, मारहाण करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशी फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या फिर्यादीवरून आरोपी पती दत्तात्रय शिवशरण व सासू चंदाबाई शिवशरण यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दाईंगडे यांनी करीत आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले आणि दोषारोप पाठविले. या पुराव्यांवरून जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पती दत्तात्रय राम शिवशरण यास भा.दं.वि. ४९८ अ, ३४, ३०४, ३०६ या कलमांखाली ८ वर्षे सक्तमजुरी कैद व २ हजार रु. दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच सासू चंदाबाई राम शिवशरण हिलाही भा.दं.वि. ३०६, ३०४ या कलमांखाली ७ वर्षे सक्तमजुरी कैद व २ हजार रु. दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक दाईंगडे, कोर्ट पैरवी म्हणून तांबोळी, गुत्तीकोंडा तसेच सरकारी वकील म्हणून कुलकर्णी यांनी काम पाहिले.