Good News; सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास मोफत बदलून देणार
By appasaheb.patil | Published: June 1, 2020 02:39 PM2020-06-01T14:39:52+5:302020-06-01T14:41:26+5:30
महावितरणचा निर्णय : जिल्ह्यात ११६५ पैकी ३६५ जोडण्या पूर्ण, ८०० प्रगतीपथावर
सोलापूर : महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषीपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषीपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषीपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यात नादुरुस्त झालेले सौर कृषीपंप महावितरणकडून मोफत बदलून देण्यात येणार आहे.
महावितरणने एजन्सीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार शेतकºयांकडे बसविण्यात आलेल्या सौर कृषीपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी ठरविण्यात आला आहे.
हमी कालावधीत सौर कृषीपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौरपंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वादळी पावसामुळे किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास सौरपंपाची दुरुस्ती किंवा बदलून देण्यासाठी संबंधित शेतकºयांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे महावितरणने सांगितले.
शेतकºयांनी सौर कृषीपंप नादुरुस्त झाला असल्यास किंवा सौर पॅनलमध्ये बिघाड झाल्यास २४ तास सुरू असलेल्या कॉल सेंटरच्या १९१२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. महावितरणकडून संबंधित एजन्सीला ही तक्रार पाठवून सौर कृषीपंपाची दुरुस्ती करण्याची किंवा तो बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
-ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल