Good News; हुतात्मा इंटरसिटी झाली आता २२ डब्यांची
By appasaheb.patil | Published: April 22, 2019 10:20 AM2019-04-22T10:20:22+5:302019-04-22T10:22:03+5:30
पुणेरी सोलापूरकरांना दिलासा; वाढलेल्या डब्यांमुळे तिकीट कन्फर्मची कटकट मिटली
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूरला पुण्याशी जोडणारी हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१५८/१२१५७) ही आता २२ डब्यांची झाली आहे़ या वाढलेल्या डब्यांमुळे नियमित सोलापूर-पुणे व पुणे ते सोलापूर प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाने सुवार्ता दिली आहे.
मध्य रेल्वे सोलापूर विभागात असलेल्या कुर्डूवाडी सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे़ तत्पूर्वी या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता सोलापूर विभागाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयास एंटरसिटी एक्सप्रेसला चार डबे वाढवावेत याबाबतचा अहवाल पाठविला होता़ त्यानुसार या अहवालाची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने चार डबे वाढविण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला़ त्यानुसार शनिवारी २० एप्रिलपासून एंटरसिटी एक्सप्रेसला चार डबे वाढविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिराडे यांनी दिली.
जनरल डब्यांमध्ये वाढ
हुतात्मा एक्सपे्रस आता २२ डब्यांची झाली आहे. यात एसी २, सेकंड क्लास १३, जनरल डबे ६, एक साधा डबा असे २२ डबे असणार आहेत.
इंटरसिटीचा आजपर्यंतचा प्रवास
प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे विभागाने १५ जुलै २००१ साली सोलापूर मंडलातून सोलापूर ते पुणे या मार्गावर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस या नावाची गाडी सुरू केली़ सुरूवातीला १२ डबे असलेल्या एक्सप्रेसला १ जुलै २००७ रोजी एक, १५ आॅगस्ट २००८ साली एक, १ आॅगस्ट २०१६ रोजी दोन, ३१ जुलै २०१७ साली २ तर २० एप्रिल २०१९ पासून ४ डबे वाढविण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे १२ डब्यांची हुतात्मा आता २२ डब्यांची झाली आहे.
हुतात्मा एक्सप्रेसच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे. ही गाडी आता २२ डब्यांची झाली आहे. वाढीव जनरल डब्यांमुळे नियमित सोलापूर ते पुणे प्रवास करणाºया सर्वसामान्य नागरिक, नोकरदारांना चांगला दिलासा मिळणार आहे. या वाढीव डब्यांचा प्रवाशांनी लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करावा.
- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे