Good News; मार्चपर्यंत ५० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित वीज बिल होणार माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 01:27 PM2021-07-22T13:27:39+5:302021-07-22T13:27:44+5:30
महावितरणची अभिनव योजना - साडेतीन लाख कृषिपंपधारकांकडे थकली तीन हजार ५७२ कोटींची बिले
सोलापूर : कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून कृषिपंपाच्या वीज बिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ९३० कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या ४७७ कोटी १९ लाखांचे चालू वीज बिल व ३५७२ कोटी ८४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. योजनेनुसार येत्या मार्चपर्यंत यातील ५० टक्के रक्कम व चालू वीज बिल भरल्यास उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम माफ होणार आहे. मात्र, योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ५६९ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ३२ कोटी ९३ लाख व चालू वीज बिलांच्या १०३ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ७३७ कोटी ५५ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ९ हजार १८५ शेतकरी वीज बिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज बिल व थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकूण ३७ कोटी ९५ लाख रुपयांचा भरणा केला आहे, तर २७ कोटी ८३ लाख रुपयांची अतिरिक्त सूट घेऊन संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे.
थकबाकीमुक्त होण्याची शेतकऱ्यांना संधी...
गेल्या मार्चपासून महावितरणने कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात केली. या धोरणातील योजनेप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील एकूण तीन लाख ६८ हजार ११५ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचे ४८७ कोटी ३२ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्च २०२२ पर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ होणार आहे.