Good News; सोलापूर महानगरपालिकेत मिळणार जॉब; ४५७ जागांवर होणार भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 04:45 PM2021-12-29T16:45:43+5:302021-12-29T16:45:50+5:30
नवा आकृतिबंध मंजूर : आणखी एक अतिरिक्त आयुक्तही भरणार
सोलापूर : राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या नव्या आकृतिबंधाला मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेत आता आणखी एक अतिरिक्त आयुक्त असतील तर आठ विभागीय कार्यालयाचे प्रमुख सहायक आयुक्त असतील. पालिकेत नव्याने ४५७ पदांना मंजुरी मिळाली असून या पदावर नोकर भरती होऊ शकेल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सोलापूर महापालिका ‘ड’ वर्गात येते. पालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. आकृतिबंधाशिवाय भरती करणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात अडचणी येत होत्या. १५ डिसेंबर २०२० मध्ये महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून अंतिम रूप देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी १३ जुलै २०२१ रोजी अंतिम रूप दिले. पालिकेत एकूण ५४३४ पदे मंजूर होती. समितीने १२७९ पदे वगळण्याची शिफारस केली. आकृतिबंधासाठी ४१५५ पदांचा विचार झाला. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी ५५१ वाढीव पदांची मागणी केली. यातही शासन स्तरावर ९४ पदे कमी झाली. अखेरीस ४५७ पदे विचारण्यात घेण्यात आली. त्यानुसार एकूण ४६१२ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. अखेर शासनाने याला मंजुरी दिली.
या पदांवर मिळू शकते नोकरीची संधी
कार्यकारी अभियंता (विद्युत) १, उपअभियंता १, सहायक अभियंता (स्थापत्य) १५, उद्यान संचालक १, सहायक सार्वजनिक आरोग्य आरोग्य अधिकारी १, सहायक आयुक्त (विभागीय अधिकारी) ८, वृक्ष अधिकारी १, कार्यालय अधीक्षक १०, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४८, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) १, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाइल) १, सहायक जीव शास्त्रज्ञ १, मुख्य आरोग्य निरीक्षक २, मलेरिया पर्यवेक्षक ३, वरिष्ठ मुख्य लेखनिक ३०, केमिस्ट २, आरोग्य निरीक्षक ३, अग्निशमन केंद्र अधिकारी ५, स्टेनो टायपिस्ट १, कनिष्ठ अभियंता (सहायक) ३९, जनसंपर्क अधिकारी १, नेटवर्क इंजिनिअर १, इलेक्ट्रिशियन ४, फिल्टर इन्स्पेक्टर २, ग्रंथपाल १, कीटक समाहारक ३, संगणक हार्डवेअर ३, साउंड ऑपरेटर १, जेसीबी चालक ८, ॲनिमल किपर १, फिजिकल इन्स्ट्रक्टर १, विद्युत दाहिनी ऑपरेटर २, पाइप फिटर ५, हेडमाळी १, हत्यारी रखवालदार २, फायरमन ३८, क्षेत्र कार्यकर्ता ७०, बिगारी १३२, झाडूवाली ४.