Good News; सिव्हिलमध्ये साकारणार मॉडर्न आयसीयू; प्रत्येक बेडला असणार व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 12:46 PM2021-01-01T12:46:17+5:302021-01-01T12:46:22+5:30
कोरोनानंतर प्रत्येकाच्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. आरोग्यसेवेचे महत्त्व वाढले आहे
सोलापूर : नव्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) मॉडर्न आयसीयू साकारण्यात येणार आहे. रुग्णांना अतिउच्च दर्जाची सेवा मिळण्यासाठी यंदाच्या वर्षी अधिक प्रयत्न रुग्णालयातर्फे करण्यात येणार आहेत.
कोरोनानंतर प्रत्येकाच्या जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. आरोग्यसेवेचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे ६० व्हेंटिलेटर वाढविण्यात आले होते. यात आणखी काही व्हेंटिलेटरची भर घालून संपूर्ण आयसीयूच्या बेडला व्हेंटिलेटरची सोय करण्यात येणार आहे. आयसीयूमध्ये अत्याधुनिक बदल करून गरीब रुग्णांना उच्च प्रतीची सेवा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
आयसीयूचे एसीचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे बाहेरचे जंतू आयसीयूमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत, तसेच प्रत्येकवेळी आयसीयूची हवा शुद्ध राहण्यास मदत मिळेल. एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला संसर्गापासून वाचविणेही शक्य होईल. निर्जंतुकीकरण करण्यासाठी रुग्णालयात एअर शॉवरची यंत्रणा नव्या वर्षात कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टम
आयसीयूमधील एका बेडला तीन प्रकारचे मॉनिटर असतात. यावर रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी, हृदयाची गती आदी बाबी दर्शविल्या जातात. प्रत्येकवेळी डॉक्टर किंवा परिचारिका यांना याकडे लक्ष देणे कठीण जाते. यामुळे आयसीयूमध्ये सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टम सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रत्येक बेडवरील रुग्णाच्या स्थितीवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवणे सोपे जाईल. या सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टमचा व्हिडिओ अधिष्ठातांच्या मोबाइलवर पाहणे शक्य होणार आहे.
कार्डियाक अॅम्ब्युलन्स
आयसीयूमधील रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा आवश्यक असते. ही सर्व यंत्रणा कार्डियाक अॅम्ब्युलन्समध्ये असते. अॅम्ब्युलन्समधील मॉनिटरच्या साह्याने रुग्णाच्या ह्रदयाचे स्थिती, श्वासाची गती पाहता येते. गंभीर रुग्णाला दूरचा प्रवास करून जाणे शक्य होते. यासाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात येणार आहे.
सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णात कामगार वर्गाची संख्या जास्त आहे. त्याच्यावर एखादी शस्रक्रिया झाल्यास त्यांना काही दिवस आराम करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीच्या साह्याने शस्रक्रिया करण्याची सुविधा आहे. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन कामावर हजर राहू शकतो. या प्रकारच्या अत्याधुनिक सेवेत यंदाच्या वर्षी अधिक वाढ करण्याचा आमचा संकल्प आहे.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, सोलापूर.