Good News; नव्या वर्षात रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल
By appasaheb.patil | Published: December 21, 2020 09:00 AM2020-12-21T09:00:47+5:302020-12-21T09:01:10+5:30
दुहेरीकरण, विद्युतीकरणाचा परिणाम; एक्सप्रेस, पॅसेजर व मालगाड्यांच्या ताशी वेग वाढणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : लॉकडाऊनकाळात पूर्णत्वास आलेले दुहेरीकरण, विद्युतीकरणाचे काम, पुलांची झालेली डागडुजी व अन्य प्रलंबित ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यामुळे देशभरातील एक्सप्रेस, पॅसेजर व मालगाड्यांचा ताशी वेग ३० ते ४० किमीने वाढणार आहे. शिवाय रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल होणार असून नव्या वेळापत्रकाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून नव्या वर्षात देशभरातील सर्वच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या वृत्ताला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी दुजोरा दिला आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. याचाच फायदा घेत भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रलंबित दुहेरीकरण, विद्युतीकरणासोबत पुलांची डागडुजी, रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. लॉकडाऊनच्या आठ महिन्यात रेल्वेने ९० टक्के प्रलंबित कामे पूर्ण केली आहेत. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे सिग्नलला गाडी थांबणे, गाड्यांचा ताशी वेग वाढणे, गर्दी नसलेले थांबे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येत असल्यामुळे रेल्वेचे नवे वेळापत्रक तयार होत आहे, त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून नव्या वर्षापासून देशभरातील सर्वच रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकात निश्चितच बदल होईल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
-------------
थांब्याची संख्या घटणार
भारतीय रेल्वे मंत्रालयाने नवे वेळापत्रकात बनविताना छोटे छोटे रेल्वे स्टेशनवर गाडी न थांबविण्याचा निर्णय घेणार आहे. ज्या स्टेशनवरून कमी प्रमाणात प्रवासी चढ-उतार करतात, रेल्वेला कमी उत्पन्न मिळते अशा स्टेशनवर गाडी न थांबविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असल्याचे सांगण्यात आले.