Good News; आता घर बसल्या घ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:38 PM2020-06-16T20:38:18+5:302020-06-16T20:42:06+5:30
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आवाहन
पंढरपूर : कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. भाविकांना श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’ या मोबाईल अॅपलिकेशनद्वारे घ्यावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.
कोरोना व्हायरस (कोविड १९) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरुपाचा असल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीत भाविकांना पदस्पर्श व मुख दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. परंतु विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरु आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपुरच्या www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर तसेच टिव्ही व डिश वर श्री विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन २४ तास उपलब्ध आहे. तसेच ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’’ या मोबाईल अॅपलिकेशनवर देखील उपलब्ध आहे. हे मोबाईल अॅप गुगल अॅपस्टोअरवर ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान’ या नावाने मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, भाविकांना जरी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद असले, तरी वरील संकेत स्थळावरुन तसेच खाजगी कंपंनी आणि मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या श्री च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.