Good News; आता स्वत:च्या सायकलवर बसून कष्टकऱ्यांच्या मुली जाणार शाळेत, बसप्रवासही मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:59 AM2023-02-21T10:59:58+5:302023-02-21T11:00:42+5:30
सोलापूर महानगरपालिका वेगळा उपक्रम; मनपा शाळेच्या विद्यार्थिनींना मोफत सायकल
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महापालिकेच्या शाळेतील मुलींची पटसंख्या वाढावी, मनपा शाळेबाबत शहरातील मुलींमध्ये ओढ निर्माण व्हावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेतील नववी व दहावीच्या मुलींना यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून मोफत सायकल देण्यात येणार आहे. हा उपक्रम दानशूर व्यक्तींसोबतच सीएसआर फंडाच्या मदतीने पूर्ण करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या युगात शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन, डिजिटल, ऑफलाइन शाळेबरोबरच कौशल्यावर आधारित शाळांमध्येशाळांच्या इमारती, पायाभूत सुविधांवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे खासगी शाळांकडे मुलांचा अधिक ओढा असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळांनीही सेवासुविधांमध्ये वाढ करीत वेगळी कात टाकण्यास सुरूवात केली आहे. गुणवत्ता वाढविण्याबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर महापालिका भर देत आहे. संगणकाचे ज्ञान, क्रीडा या प्रकारातही आता मनपा शाळेचे मुलं अव्वल क्रमांक पटकावीत आहेत.
मोफत बस प्रवासही मिळणार
महिला व बालकल्याण योजनेंतर्गत मनपा शाळेतील आठवी व नववीच्या विद्यार्थिनींना त्यांच्या प्रवासासाठी मोफत बस प्रवासाची योजना, तसेच महिलांना व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षणामध्ये संगणक कोर्स, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, लेडीज टेलरिंग आदीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मुलींचा ओढा महापालिका शाळांकडे अधिक वाढावा. त्यांचे ॲडमिशन वाढावे, यासाठी महापालिका हा उपक्रम राबवीत आहे. यासाठी सीएसआर फंड, बँका, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजकांची मोठी मदत होत आहे. ८ मार्च २०२३ पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
- शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर महानगरपालिका