आनंदाची बातमी; आता तासाभरात मिळतोय प्रवासासाठीचा ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:56 PM2020-06-23T17:56:32+5:302020-06-23T17:56:50+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

Good News; Now you can get e-pass for travel within an hour | आनंदाची बातमी; आता तासाभरात मिळतोय प्रवासासाठीचा ई-पास

आनंदाची बातमी; आता तासाभरात मिळतोय प्रवासासाठीचा ई-पास

Next

सोलापूर  : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे सोलापूर ग्रामीण भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि नोकरदार यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी १ मे २०२० पासून आॅनलाईन ई-पास दिला जात आहे. ई-पासविषयी अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, आज २३ जून २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत ग्रामीण भागात १ लाख २९ हजार ८८० अर्जदारांचे अर्ज आॅनलाईन आले आहेत. १ लाख ११ हजार ७३१ अर्जांना मंजुरी दिली असून १७ हजार ४७८ अर्ज नाकारले आहेत. मंजूर अर्जामध्ये सुमारे ९७ हजार अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तर १६ हजार परवानग्या ह्या परराज्यात जाण्यासाठी देण्यात आल्या आहेत. ६७१ प्रलंबित अर्ज हे आज मंजूर होतील.
-------------
आदिवासी बांधवांना आॅफलाईनचा आधार
 नंदूरबार, रायगड या भागातील ४६१ आदिवासी बांधव जिल्ह्यात अडकून पडले होते. विशेष बाब म्हणून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅफलाईन परवानगी दिली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे असलेल्या याद्यामधून ४६१ आदिवासी बांधवांना परवानगी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीही आॅफलाईनची मदत घेण्यात येऊन ८ हजार ७०१ नागरिकांना परवानगी देण्यात आली.
---------------
असा करा अर्ज
 रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने विकसित केलेल्या वेबसाईटवरून ई-पाससाठी आॅनलाईन अर्ज करता येतो. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कोठून कुठे करणार, प्रवासाची व परतीची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहन क्रमांक आदी माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कशासाठी पाहिजे त्याचा पुरावा, ओळखपत्र किंवा कोविड-१९ ची लक्षणे नसल्याचा वैद्यकीय दाखला जोडावा. परिपूर्ण अजार्ला तत्काळ परवानगी देऊन ई-पास आॅनलाईन उपलब्ध करून दिला जातो.
-----------------
कसे चालते कामकाज
हे कार्यालय सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत संपूर्ण आठवडाभर सुरू आहे. एका उपजिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक, संगणक चालक व इतर कर्मचारी कामकाज पाहतात. दोन कर्मचारी हे दूरध्वनी (०२१७-२७३१००७) आणि समक्ष नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. आलेल्या आॅनलाईन अर्जावर प्रक्रिया करून योग्य कारणे असतील, सर्व पुरावे जोडले असतील तर वेबसाईटची अडचण दूर झाल्याने तत्काळ परवानगी दिली जात आहे. आता इतर जिल्ह्याचा ना हरकत परवाना लागत नसल्याने कामाची गती वाढली आहे.
-------------------
तातडीसाठी केव्हाही उपलब्ध
कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 असे चालू असले तरी काहीवेळा तातडीचे वैद्यकीय कारण असते किंवा जवळच्या नातेवाईकाचे निधन होते. अशावेळी तत्काळ समन्वय साधून विशेष बाब म्हणून मध्यरात्री किंवा पहाटेही ई-पासची परवानगी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Good News; Now you can get e-pass for travel within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.