नर्सने रुग्णाला दिली गुड न्यूज; तेव्हा डॉक्टरला मिळाली बॅड न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:09 PM2019-03-07T17:09:26+5:302019-03-07T17:12:34+5:30
संताजी शिंदे सोलापूर : मोहोळ येथील विहान हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करण्यात आले. पूर्वी नर्स तर सध्या एजंट म्हणून काम ...
संताजी शिंदे
सोलापूर : मोहोळ येथील विहान हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करण्यात आले. पूर्वी नर्स तर सध्या एजंट म्हणून काम करणारी महिला माया अष्टुळ बाहेर आली. तिने नातेवाईकास ‘तुमच्यासाठी गुड न्यूज.. अभिनंदन.. मुलगाच आहे,’ अशी माहिती दिली. त्याचवेळी आरोग्य अधिकाºयाच्या पथकाने डॉक्टरच्या केबिनमध्ये जाऊन हॉस्पिटलवर रेड पडल्याची बॅड न्यूज दिली. जिल्ह्यात गर्भलिंग निदानप्रकरणी करण्यात आलेली ही पाचवी कारवाई आहे.
कामतीमध्ये एका बारशाच्या कार्यक्रमात मुलगा आहे की नाही, यासाठी गर्भलिंग निदान करण्यात आले होते, अशी गुप्त चर्चा महिलांमध्ये झाली होती. ही चर्चा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्या कानावर आली. डॉ. सुमेध अंदूरकर यांनी आपल्या कर्मचाºयांच्या सहायाने माहिती मिळवण्यास सुरुवात केली.
गर्भलिंग निदान करण्यासाठी तोतया ग्राहक तयार करण्यात आले. माहिती देणाºया व्यक्तीने शोध करीत माया अष्टुळ या महिलेशी संपर्क साधला. तिला विश्वासात घेऊन महिलेचे गर्भलिंग निदान करावयाचे आहे, असे सांगितले. माया अष्टुळ या महिलेने होकार देत यासाठी सोळा हजार रुपये लागतात, असे सांगितले. रकमेवर तडजोड करण्यात आली. शेवटी १३ हजार रुपयाला गर्भलिंग निदान करण्याचे ठरले, मात्र जर मुलगा असेल तर स्वखुशीने मला १ हजार रुपये बक्षीस म्हणून द्यावे लागतील, असे सांगितले.
तोतया गरोदर महिला ग्राहक व तिच्या नातेवाईकाने याला होकार दिला. गरोदर महिलेस २ मार्च रोजी सोलापूर येथे बोलावण्यात आले. तिथे नियोजन करण्यात आले. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता माया अष्टुळ हिने गर्भवती महिलेस पंढरपूर येथील एस.टी. स्टँड येथे येण्यास सांगितले. महिला दुपारी १२ वाजता स्टँडवर पोहोचली. तेथून माया अष्टुळ हिने महिलेस घेऊन पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे सायंकाळी ४ वाजेपर्यंत डॉक्टरची वाट पाहण्यात आली. डॉक्टर न आल्याने माया अष्टुळ हिने गरोदर महिला व तिच्या नातेवाईकास एस.टी.ने मोहोळ येथे नेले.
तेथे तिने नेहमीच्या रिक्षाचालकास बोलावून घेतले. सायंकाळी ६ वाजता विहान हॉस्पिटल गाठले. रितसर ६०० रुपये देऊन केसपेपर काढण्यात आला. हॉस्पिटलची नर्स आणि माया अष्टुळ या दोघी तोतया ग्राहक असलेल्या गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान मशीनच्या रूममध्ये घेऊन गेल्या. काही वेळाने माया अष्टुळ बाहेर आली आणि सोबत असलेल्या नातेवाईकाला म्हणाली ‘तुमच्यासाठी गुड न्यूज... मुलगाच आहे’, असे म्हणताच हॉस्पिटलमध्ये दबा धरून बसलेले आरोग्य विभागाचे पथक, पोलिसांनी महिलेला पकडले.
निवासी वैद्यकीय अधिकारी मोहन शेगर यांनी डॉक्टर डॉ. सत्यजित मस्के यांच्या केबिनमध्ये जाऊन बेकायदा गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी हॉस्पिटलवर धाड पडल्याची बॅड न्यूज दिली. ही कारवाई प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी जयश्री ढवळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, मोहोळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. पी. गायकवाड, लीगल अॅडव्हायजर अॅड. जयश्री माने, कक्ष सेवक हनिफ शेख यांनी पार पाडली. सोबतीला स्थानिक पोलीस, तलाठी आदींची मदत घेतली.
व्हॉट्सअॅपवरून झाला सर्व संवाद...
- - कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक व तोतया गरोदर महिला व तिच्या नातेवाईकाने एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला. २ ते ३ मार्चदरम्यान सर्व टीम व्हॉट्सअॅपवरून एकमेकांना माहिती देण्या-घेण्याचे काम करीत होते.
- - पैशाचा व्यवहार हा रिक्षात होत होता. हा रिक्षाचालक नेहमीचा असून यापूर्वीही गर्भलिंग निदान करण्यासाठी त्याला बोलावण्यात आले होते.
- १३ हजारांपैकी ८ हजार अॅडव्हान्समध्ये देण्यात आले होते, राहिलेले ५ हजार व गुड न्यूज असल्यास १ हजार अधिकचे देण्यात येणारे ६ हजार रुपये रिपोर्ट आल्यानंतर देण्याचे ठरले होते.
- गर्भलिंग निदान केल्यास संबंधित डॉक्टरला तीन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. गर्भलिंग निदान मशीन जप्त केली जाते.