Good News; आजपासून केशरी कार्डधारकांना मिळणार धान्य...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 08:12 AM2020-04-26T08:12:59+5:302020-04-26T08:15:13+5:30
सोलापूर जिल्ह्यासाठी ४२ हजार क्विंटल धान्य: वाटपासाठी उचलले २१ हजार क्विंटल
सोलापूर : आतापर्यंत धान्य मिळालेले नव्हते, पण आता लॉकडाउनच्या काळात मागणी असलेल्या केशरी कार्डधारकांना २६ एप्रिलपासून गहू व तांदूळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या कार्डधारकांना एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांचे धान्य वाटपाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे यातील प्रत्येकास ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. आता आॅनलाईन नसलेल्या व प्रगत उत्पन्न गट असलेल्या केशरी कार्डधारकांनाही शासनाने घोषित केल्याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी १ मे पासून हे धान्य वितरित करण्यात येईल, असे सांगितले होते. पण आता धान्याचा कोटा आलेला आहे.
शासनाकडून केशरी कार्डधारकांसाठी धान्य वितरित करण्यासाठी ४२ हजार ९० क्विंटल गहू व तांदळाचा साठा आलेला आहे. हे धान्य वितरित करण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांना वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत दुकानदारांनी २१ हजार ५०० क्विंटल धान्य उचलले आहे. त्यामुळे हे धान्य रविवारपासून वाटण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
२७ एप्रिलपर्यंत 'जैसे थे'
सोलापुरात २७ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यानंतर या धान्याचे वाटप होईल. तालुक्याच्या ठिकाणीही अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण बऱ्याच गावांमध्ये अशी परिस्थिती नाही. ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार धान्य वाटपाचे वेळापत्रक ठरविले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.