Good News; रोबोट करतोय रूग्णांची ताप, नाडी अन् ऑक्सिजन तपासणी..
By appasaheb.patil | Published: August 11, 2020 01:24 PM2020-08-11T13:24:00+5:302020-08-11T13:44:47+5:30
सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलचा कोरोना वॉर्ड; स्वयंचलित सॅनिटायझर फवारणीची सोय
सुजल पाटील
सोलापूर : कोरोनाग्रस्त रुग्णांपासून डॉक्टर व कर्मचाºयांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या डॉ़ कोटणीस स्मारक रेल्वेहॉस्पिटलमधील कोविड वॉर्डात रोबोट दाखल करण्यात आला आहे़ या रोबोटच्या माध्यमातून सध्या हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांची नाडी, आॅक्सिजन, तापाची नियमित तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णांना अन्न- पाण्यासह औषधोपचाराचा पुरवठा करणे, त्यांच्यासोबत संवाद साधण्याबरोबरच सॅनिटायझरने हात स्वच्छ धुण्यासही रोबोट मदत करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
कोरोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाºयांना स्वत:ला सुरक्षित अंतर ठेवून रुग्णांवर उपचार करणे खूप कठीण काम बनले होते़ एवढेच नव्हे तर संसर्ग होऊ नये, यासाठी घातलेल्या पीपीई किटमुळे ६ तासांच्या शिफ्टमध्ये असंख्य अडचणी येत होत्या़ त्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अभियांत्रिकी विभागाने रोबोटची निर्मिती केली़ कोरोना काळात रेल्वे विभागाचा पहिला रोबोट ५ मे २०२० रोजी दाखल झाला़ त्यानंतर त्याच रोबोटमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह विविध अद्ययावत सेवासुविधांचा वापर करून नव्याने रोबोट तयार केला़ हा रोबोट आता नुकताच रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे़ या स्वयंचलित रोबोटच्या कामगिरीमुळे रेल्वे प्रशासनाचे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून विशेष कौतुक होत आहे.
करमणुकीसाठी नृत्य व संगीताचाही समावेश
नव्याने दाखल करण्यात आलेला हा रोबोट ५ किलोपर्यंत भार वाहू शकतो़ हा अत्याधुनिक रोबोट रुग्ण व डॉक्टरांमधील महत्त्वाचा दुवा बनला आहे़ रुग्णांच्या करमणुकीसाठी या रोबोटमध्ये नृत्य व संगीत देण्याचाही समावेश करण्यात आला आहे़ वेळोवेळी रुग्णांना हवे असलेले अन्न, पाणी, औषधे यांसारख्या वस्तू या रोबोटच्या माध्यमातून रुग्णांना पोहोचविल्या जात आहेत़
रेल्वे मंत्र्यांनी केले कौतुक
अत्याधुनिक स्वरूपाचा रोबोट बनविल्यामुळे डॉक्टर व कर्मचाºयांना रुग्णांपासून होणारा कोरोनाचा धोका टळत आहे या रोबोटच्या निर्मितीचे केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून विशेष कौतुक केले आहे़ या रोबोट निर्मितीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ़ आनंद कांबळे, डीएमई सूर्यकांत मुंजेवार, चंदन माने, विनायक ढेकळे, विशाल व्हटकर, श्रद्धा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले़
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून रेल्वे प्रशासनाने सोलापुरातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती केली आहे़ हा रोबोट उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधे, गोळ्यांसह जेवणही पोहोचविणार आहे़
- डॉ. आनंद कांबळे,
रेल्वे हॉस्पिटल प्रमुख, सोलापूर