Good News; सोलापुरातील होम मैदानालगतचा दुसरा रस्ताही सुशोभित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:15 PM2020-11-24T16:15:21+5:302020-11-24T16:16:37+5:30
स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणार काम; बचतीच्या पैशातूनच होणार काम
सोलापूर : होम मैदानालगतच्या नव्या सुशोभित रस्त्यावर दररोज चार हजारांहून अधिक लोक विरंगुळा, सेल्फीसाठी येत आहेत. हा प्रतिसाद पाहता मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ते फडकुले हॉलदरम्यानचा रस्ताही सुशोभित करण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीने हाती घेतले आहे.
होम मैदानालगतचा आपत्कालीन रस्ता स्ट्रीट बझारसाठी सुशोभित करण्यात आला. संरक्षक भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. या ठिकाणी आता बसण्यासाठी कट्टे असून झाडे आणि आकर्षक लाईटही आहेत. पायी फिरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, वाहने येऊ नयेत, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मॉडर्न आर्टच्या कलाकृतींसोबत सेल्फी घेण्यासाठी, सायंकाळच्या सुंदर वातावरणात कुटुंबासह वेळ घालविण्यासाठी अनेक सोलापूरकर या रस्त्यावर दाखल होत आहेत. स्ट्रीट बझार अद्याप सुरू झालेला नाही, मात्र हा परिसर सायंकाळी गर्दीने फुलून गेलेला असतो. हा प्रतिसाद पाहून दुसरा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुसऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि फूटपाथ मागील वर्षीच झाला आहे. आता बाजूच्या भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात येतील. बसण्यासाठी कट्टे आणि लाईट पोलही लावण्यात येतील. मैदानाच्या एका कोपऱ्यावर पार्किंगसाठी जागा सोडलेलीच आहे. समोरच्या बाजूला आजही घाण दिसते. ही घाणही दूर होईल आणि परिसराचे रूपही बदलेल.
जुन्या रस्त्याच्या कामात पैशांची बचत झाली. या बचत झालेल्या पैशातूनच नवे काम हाती घेण्यात आले आहे. रंगभवन प्लाझा हे चांगले ठिकाण झाले आहे. शहरातील रस्त्यांचे रूप बदलायला हवे. ते टिकले पाहिजे अशी आमची संकल्पना आहे.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी कंपनी