Good News; देशभरात सहा हजार सोलापुरी पीपीई किटचा झाला पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:17 AM2020-05-03T10:17:35+5:302020-05-03T10:20:03+5:30
पंधरा हजार किटची मागणी; लंडन मधूनही सोलापुरी किटची झाली चौकशी दिल्ली, हरियाणा, झारखंड, बिहार तसेच तमिळनाडू मध्ये होतोय पुरवठा
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्याचा संसर्ग होऊ नये याकरिता सुरक्षा कवच म्हणून पीपीई किटचा वापर होतोय. सोलापुरात पीपीईची निर्मिती होत आहे. आंतरराष्ट्रीय गारमेंट कंपनीमफतलाल आणि सोलापुरातील दर्शन गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने या किटची निर्मिती होत आहे. आतापर्यंत 6 हजार सोलापुरी पीपीइ किटचा पुरवठा संपूर्ण देशभरात झालेला आहे. अजून पंधरा हजार किटची ऑर्डर असल्याची माहिती दर्शन गारमेंटचे बालाजी शालगर यांनी लोकमत'ला दिली आहे.
लंडन येथून देखील सोलापुरी किटची चौकशी झाल्याची माहिती शालगर यांनी दिली आहे. 100 जीएसएम बाई लॅमिनेटेड नॉन लिनन पासून किटची निर्मिती होत आहे. यास मेडिकल क्षेत्रातील मान्यवर संस्थांची मान्यता मिळाली आहे. तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शन सूचनेनुसार किटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोलापुरी पीपीई किटची क्वालिटी बेस्ट असल्याची प्रतिक्रिया देशभरातील डॉक्टरांनी दिली आहे. आणि किंमतीच्यादृष्टीन ही किफायतशीर आहे. यास मुंबई, पुणे, दिल्ली, झारखंड, कलकत्ता, तामिळनाडू, केरळ, बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यात सध्या पुरवठा सुरू आहे.
देशातील कानाकोपर्यातून सोलापुरी किटला मोठी मागणी येत असल्याची माहिती बालाजी शालगर यांनी दिली आहे. शालगर यांनी सांगितले, सुरुवातीला चार हजार किट आणि आता दोन हजार कीट देशभरात विविध ठिकाणी पाठवला आहे. रोज 300 ते चारशे किटची निर्मिती ती सुरू आहे. याकरिता 50 कामगार काम करतायेत.
देशभरातून मागणी प्रचंड आहे. किमान पाचशे कामगार याकरिता लागणार आहेत. मालदीव आणि लंडन मधूनही सोलापुरी किती चौकशी झाली आहे. सध्या एक्सपोर्ट पूर्णपणे बंद असून विदेशात एक्सपोर्ट करणे अशक्य आहे. आमचं प्राधान्य देशभरातील मागणीला असेल. देशभरातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आम्ही सर्वोत्तम सुरक्षा किट बनवला आहे.
---------------------------------------/
अधिक माहिती देताना सोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशनचे अमित जैन यांनी सांगितले, अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे एका युनिटवर पीपीइ किटची निर्मिती सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून तसेच देशभरातून सोलापुरी किटला मोठी मागणी आहे. किट तयार करून आरोग्य सेवकांना पुरवठा करणे ही आमच्यादृष्टीने एक देशसेवा आहे, अशी आमची भावना आहे. ही योग्य वेळ आहे, देश सेवा करण्याची. अधिकाधिक किट तयार करण्यावर आम्ही भर देतोय. पण आमच्या काही मर्यादा आहेत. सध्या एकाच युनिटवर उत्पादन सुरू असून आणखीन दहा ते 15 युनिटवर उत्पादन सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक अडचणी येत आहेत. गारमेंट उत्पादक पीपीइ करण्यास तयार आहेत. काहींनी ऑनलाईन अर्ज करून मान्यताही मिळवले आहे, पण प्रत्यक्षात उत्पादन सुरू करायला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किटची निर्मिती करणाऱ्या कारागिरांना प्रशासनाकडून पास देण्यात यावा. जेणेकरून त्यांना रोज घरी जाता येईल. कारागिरांची संख्या वाढविण्याकरिता प्रशासनाकडून परवानगी मिळावी.