Good News; आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात २१ हजार ५९१ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:18 PM2020-09-25T13:18:08+5:302020-09-25T13:19:42+5:30
७० टक्के रिकव्हरी; चोवीस तासात ५५७ पॉझिटिव्ह १२ जणांचा मृत्यू
सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ३० हजार ७८७ रुग्णांपैकी २१ हजार ५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्तर टक्के असून अद्याप ८ हजार १०३ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात ५५७ जण पॉझिटिव्ह तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ५२३ अहवालात ५४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ११७ इतकी झाली आहे. आदित्यनगरातील ३८ वर्षांचा तरुण व मजरेवाडीतील ताकमोगे वस्तीतील एका ७३ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ४६५ इतकी झाली आहे. चोवीस तासात ३0 जण कोरोनामुक्त झाले असून, आत्तापर्यंतची संख्या ६ हजार ६६१ इतकी आहे. अद्याप ९९१ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या २ हजार ६६ अहवालात ५०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ६७0 इतकी झाली आहे. चोवीस तासात ३३५ तर आत्तापर्यंत १४ हजार ९३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. ग्रामीणमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील ७६ वर्षांचे आजोबा,वाघोलीतील (ता.मोहोळ) ६७ वर्षांची व्यक्ती व भांबेवाडीतील ६0 वर्षांची महिला, दोड्डी (ता.दक्षिण सोलापूर) येथील ८६ वर्षांची वृद्धा,अकलूज (माळशिरस) येथील ६३ वर्षांची व्यक्ती, निमगाव येथील ७३ वर्षांचे आजोबा, भोसेतील (मंगळवेढा) ६0 वर्षांची महिला आणि बार्शीतील सोलापूर रोडवर राहणारे ७८ वर्षीय व उपळे (दु) येथील ७५ वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे. अशाप्रकारे ग्रामीणमधील मरण पावलेल्यांची संख्या ६२८ इतकी झाली आहे.
२ लाख ४८ हजार चाचण्या
जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार ५0 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शहरात ७७ हजार २९७ तर ग्रामीणमध्ये १ लाख ७० हजार ७५३ चाचण्यांचा समावेश आहे. यात ३० हजार ७८७ जण पॉझिटिव्ह आले असून हे प्रमाण १२.४१ टक्के इतके आहे.