खुशखबर...सोलापुरातून कोकण, अष्ठविनायकासाठी पर्यटनाच्या विशेष गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 04:31 PM2021-10-14T16:31:00+5:302021-10-14T16:31:06+5:30

गाड्यांचे नियोजन सुरू : कोटिंगमुळे प्रवाशांच्या संख्या वाढण्याची अपेक्षा

Good news ... Special tourist trains from Solapur to Konkan, Ashtavinayaka | खुशखबर...सोलापुरातून कोकण, अष्ठविनायकासाठी पर्यटनाच्या विशेष गाड्या

खुशखबर...सोलापुरातून कोकण, अष्ठविनायकासाठी पर्यटनाच्या विशेष गाड्या

Next

सोलापूर : पावसाळा असो वा हिवाळा कोकणात नेहमी हिरवळ असतेच. कोकणातील हेच नैसर्गिक सौंदर्य अल्प दरात पाहण्याची संधी एसटी प्रशासनाकडून लवकरच सोलापूरवासीयांना मिळणार आहे. पुढील काही दिवसातच सोलापुरातून कोकण, अष्टविनायकासह विविध धार्मिक पर्यटनाच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

गणेशोत्सवाचा सण उत्सव सुरू होताच कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. हा ओढा दिवाळीपर्यंत सुरूच असतो. तसेच सोलापुरातून पर्यटनासाठी राज्यभर आणि देशभर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे राज्याचे सौंदर्य सोलापूरकरांना अनुभवता यावे. त्यांची जाण्याची आणि येण्याची सोय व्हावी यासाठी एसटी प्रशासनाकडून पर्यटन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

तीन दिवसांचे कोकण पर्यटनाचे नियोजन करण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग, कोकण प्रमुख ठिकाण असणार आहेत. तसेच सोलापूरच्या जवळ असणारे त्रिदत्त म्हणजेच अक्कलकोट, कडगंची, गाणगापूर येथील श्रीदत्तचे दर्शनासाठी ही गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाकाळापूर्वी सुरू झालेली पर्यटन बस सध्या बंद असून लवकरच या बसमधून अष्टविनायक दर्शन सुरू करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन बुकिंगही करता येणार

एसटी प्रशासनाकडून आता पर्यटनावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लवकरच विविध मार्गांवर पर्यटनासाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत. यासाठी प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. पर्यटकांच्या राहण्याबाबत नियोजनही करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

कोटिंगमुळे प्रवाशांचा प्रतिसाद

सोलापूर विभागातून पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे एसटी प्रशासनाने मागील वर्षी अष्टविनायक दर्शन यासोबत त्रिदत्त दर्शन अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटन सुरू केले होते. पण त्यातच कोरोनामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या. पण सध्या प्रत्येक एसटी गाड्यांमध्ये कोरोनापासून सुरक्षा देणारे कवच असलेले कोटिंग करण्यात येत असल्यामुळे एसटीमध्ये प्रवास करणे सुरक्षित झाले आहे. यामुळे एसटीतून प्रवास आणि पर्यटन करण्यास प्रवाशांची पसंती मिळेल अशी आशा अधिकाऱ्यांना आहे.

 

पर्यटनासाठी सोलापुरातून गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. या मागणीनुसार लवकरच आम्ही कोकणसाठी पर्यटन गाडी सोडणार आहोत. यामध्ये कोकण, अष्ठलिंग दर्शन, श्रीदत्त दर्शन अशा विविध ठिकाणी आम्ही गाड्या सोडणार आहोत. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.

- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी

सोलापूर व आजूबाजूच्या जिल्ह्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी गाड्या सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल.

- पूजा बनसोडे, प्रवासी

सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला, तुळजाभवानी मंदिर, रामलिंग, कपिलधारा अशा अनेक ठिकाणी एसटीकडून पर्यटन सेवा सुरू करता येईल. यामुळे याला प्रर्यटनालाही चालना मिळेल आणि प्रवासीही वाढतील.

- कुमार नरखेडे, अध्यक्ष, प्रवासी संघटना

Web Title: Good news ... Special tourist trains from Solapur to Konkan, Ashtavinayaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.