Good News; तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास 'ब' वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 12:34 PM2022-08-02T12:34:50+5:302022-08-02T12:34:55+5:30
दोन कोटी विकास निधीतून मंदिराचा कायापालट होणार
मंगळवेढा:मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी आमदार प्रशांत परिचारक व दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले आहे. या मंदिराच्या विकास कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार असून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रे विकासापासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान हे प्रसिध्द आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून या मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, तसेच ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून या तीर्थक्षेत्रास 'ब' वर्ग दर्जा मिळाला आहे.यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी २ कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
या माध्यमातून मंदिर परिसरात भक्त निवास वाहनतळाची उभारणी, रस्त्याची डागडुजी, पथदिवे व हायमास्ट दिव्यांची उभारणी, यात्री निवास, संरक्षक भिंतीची बांधणी तसेच बागेचे सुशोभीकरण अशी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.त्यामुळे मंदिराचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून कायापालट होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळणार आहेत. तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्याचे पत्र प्राप्त होतात ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा करण्यात आला
तळसंगी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' दर्जा प्राप्त होण्यासाठीआमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पातळीवर पाठपुराव्यास यश आले. दोन कोटी विकास निधीच्या माध्यमातून मंदिराचा कायापालट होणार आहे.--शिवानंद पाटील, चेअरमन, दामाजी साखर कारखाना मंगळवेढा