दिलासादायक बातमी; स्टार एअरलाईन्स सुरू करणार सोलापुरातून विमानसेवा
By Appasaheb.patil | Published: July 10, 2023 06:36 PM2023-07-10T18:36:19+5:302023-07-10T18:36:28+5:30
चेंबर ऑफ कॉमर्सला दिला शब्द; विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या
सोलापूर : सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा करण्यासंदर्भातील हालचालींना आता वेग आला आहे. स्टार एअरलाईन्स कंपनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यास अनुकुल असून लवकरच त्याचे दोन विमानं सोलापुरातून सेवा देतील अशी आशा चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्टार एअरलाईन्सचे चेअरमन संजय घोडावत यांना सोलापुरातून मुंबई, तिरुपती, दिल्ली, जयपूर व चेन्नई या ठिकाणी विमानसेवा सुरू करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. याचवेळी खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनीही घोडावत यांना विमानसेवा सुरू करण्याविषयी फोनवरून चर्चा केली. या बैठकीत उद्योग वाढीवरही चर्चा करण्यात आली. सोलापुरातून एअरलाईन्सने विमानसेवा सुरू करावी या मागणीचे निवेदन घोडावत यांना देण्यात आले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललितभाई गांधी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मी स्वतः पायलट असून ट्रेनिंगसाठी मी बरेच वेळा सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावर माझे विमान उतरवले आहे. माझे ८० आसनी दोन नवीन विमाने येत आहेत. आमचा बेस बेंगलोर व बेळगावी असून तेथून व्हाया सोलापूर कशी विमानसेवा सुरू करता येईल ते मी आमच्या टीमशी चर्चा करून पाहतो. मुंबईला स्लॉट कसा मिळतो ते बघतो.
- संजय घोडावत, चेअरमन, स्टार एअरलाईन्स.
बेंगलोर, हैदराबादसाठी स्पाईस जेट, अलाईन्सला परवानगी
होटगी विमानतळावर बेंगलोर व हैदराबादसाठी स्पाईस जेट व अल्लाईन्स कंपनीला या आगोदरच उड्डाण योजनेअंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित मार्गावरही विविध विमान कंपन्यांशी पत्रव्यवहार, चर्चा सुरू असल्याचे सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी सांगितले.