Good News; सोलापुरातील तीन रुग्णांनी केली 'कोरोना' वर मात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 07:14 PM2020-04-30T19:14:16+5:302020-04-30T19:17:17+5:30
डॉक्टरांनी केले स्वागत; दुबार चाचणी घेतल्यानंतर दिली परवानगी
सोलापूर: सोलापुरात 'कोरोना' बाधित तीन रुग्ण उपचारनंतर बरे होऊन सिव्हिल हॉस्पीटलमधून गुरूवारी घरी परतले आहेत. हे रुग्ण परतत असताना उपस्थित अधिकारी व डॉक्टरांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
सोलापुरात १३ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर त्याचा संपर्क शोधण्यात आला. ज्या रुग्णालयात त्यांना आजारामुळे अॅडमिट करण्यात आले होते, त्या रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील काही कर्मचारी 'कोरोना' पॉझीटीव्ह आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पीटलच्या ए ब्लॉकमधील आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. २८ एप्रिल रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यावर या रुग्णांची दुबार टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली.
गुरूवारी दुपारी आयसोलेशन सेंटरमधून हे रुग्ण बाहेर पडत असताना डॉक्टरांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, संजय नवले आदी उपस्थित होते.