Good News; सोलापूर स्मार्ट सिटीच्या योजनेतून तीन गावांची भागणार तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:43 AM2020-02-28T10:43:38+5:302020-02-28T10:45:33+5:30
कंपनीच्या बैठकीत मिळाली मंजुरी; होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडीचा समावेश
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडी या तीन गावची पाणीपुरवठा योजना करण्यास सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनी (स्मार्ट सिटी) च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्मार्ट सिटी कंपनीची बैठक गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झाली. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे होते. महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कंपनीचे सीईओ दीपक तावरे, सभागृह नेते श्रीनिवास करली, कंपनीचे संचालक प्रा. नरेंद्र काटीकर, अविनाश पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, नगररचनाचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी, मुख्य तांत्रिक अधिकारी विजय राठोड, पाणीपुरवठा विभागाचे संजय धनशेट्टी, समन्वयक तपन डंके आदी उपस्थित होते. कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अनुपस्थित होते.
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासाठी एनटीपीसीने स्मार्ट सिटी कंपनीला २५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी मंजूर करताना एनटीपीसीने होटगी स्टेशन, फताटेवाडी, आहेरवाडी या तीन गावांना पाणीपुरवठा करण्याची अट स्मार्ट सिटी कंपनीला घातली होती. महापालिकेने समांतर जलवाहिनीची ४५० कोटी रुपयांची पहिली निविदा काढताना या तीन गावच्या पाणीपुरवठा योजना कामाचा समावेश केला होता, परंतु मक्तेदाराने हे काम जादा दराने मागताना तीन गावची पाणीपुरवठा योजना वगळण्यास सांगितले. त्यानुसार हे काम वगळण्यात आले.
दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने या कामासाठी नव्याने १५ कोटी रुपयांची तरतूद केली. सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातून होटगी, फताटेवाडी आणि आहेरवाडी गावची पाणीपुरवठा राबविण्यात येईल. या कामाची निविदा लवकरच निघेल, असे सीईओ दीपक तावरे यांनी सांगितले.
सात रस्ता येथील बस डेपोच्या जागेत स्मार्ट पार्किंग, व्यापारी संकुल, अत्याधुनिक ग्रंथालय असे सेंटर असावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्याबाबत पुढील बैठकीत चर्चा करण्याचा निर्णय झाला.
महिलांसाठी हवा स्वतंत्र जिमखाना
- - पार्क स्टेडियमवर क्रिकेटचे मैदान आणि इतर कामे सुरू आहेत. याशिवाय पॅव्हेलियनच्या बाजूला व्हॉलिबॉल मैदान आणि अत्याधुनिक जिमखाना करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी दीड कोटी रुपये मंजूर केले. पुरुषांसोबत महिलांसाठी स्वतंत्र जिमखाना असावा, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे तावरे यांनी सांगितले.
- लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत एक्झीबिशन सेंटर
- - होम मैदानावर कार्यक्रमास बंदी आहे. पार्क स्टेडियम केवळ खेळांसाठी राखीव आहे. त्यामुळे जाहीर सभा, प्रदर्शने यासाठी लक्ष्मी-विष्णू मिलच्या जागेत नव्याने मैदान विकसित करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत झाला. या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच आराखडा तयार होईल, असेही तावरे यांनी सांगितले.