प्रवाशांसाठी चांगली बातमी; कुर्डूवाडी-मोहोळ मार्गावर धावली विजेवरील रेल्वे
By appasaheb.patil | Published: February 27, 2021 03:45 PM2021-02-27T15:45:09+5:302021-02-27T15:45:23+5:30
चाचणी यशस्वी- कमिशनिंग रेल्वे सेफ्टीच्या चाचणीनंतरच नियमित धावणार रेल्वे गाड्या
सोलापूर - मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात असलेल्या कुर्डूवाडी-मोहोळ या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विजेवरील रेल्वे गाडीची प्रायोगिक चाचणी (लोको टेस्टिंग) यशस्वी झाली. इंधन बचतीबरोबर विजेवर गाडी चालणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भिगवण ते सोलापूर व सोलापूर ते कलबुर्गी या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात विद्युतीकरणाच्या कामांचे पोल उभारण्याचे काम सुरू असून लवकरच सोलापूरमार्गे धावणाऱ्या सर्वच गाड्या या विजेवर धावणार असल्याचे सांगण्यात आले. डिझेलचा तुटवडा असल्याने विजेवरील रेल्वे सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा ठरणार आहे. या रेल्वेमुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे. मात्र, कमिशनिंग रेल्वे सेफ्टीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर विजेवरील पॅसेंजर, एक्स्प्रेस व मालगाड्या धावणार आहेत.
चाचणीवेळी या गोष्टी तपासण्यात आल्या...
कुर्डूवाडी-मोहोळ या ३८ किलोमीटरच्या मार्गावर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या चाचणीत विद्युत तारेतून येणारा सप्लाय, अप मेन लाइन, डाऊन मेन लाइन, लुप्स लाइन आदी विविध बाबी काळजीपूर्वक तपासण्यात आल्या. चाचणी पूर्ण झाल्यानंतर उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. लवकरच सीआरएस पथकाकडून तपासणी होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.