Good News; सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची मान्यता
By Appasaheb.patil | Published: October 19, 2022 05:32 PM2022-10-19T17:32:15+5:302022-10-19T17:32:21+5:30
सोलापूरहून मुंबईला पोहोचा फक्त चार तासात; देवेंद्र फडणवीसांची यांची माहिती
सोलापूर : सोलापूरच्या विकासासाठी बहुप्रतीक्षेत असलेली सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, जानेवारीत ही एक्स्प्रेस सुरू होईल, अशी माहिती खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीसांना सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला मान्यता दिल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, २२ जुलै २०२२ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यन संसदेच्या रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. याच बैठकीत मुंबई - सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली होती. त्याला मंगळवारी मान्यता मिळाली आहे. यासह रेल्वे संदर्भातील अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचीदेखील उपस्थिती होती.
--------
सोलापूरकरांचा फायदा...
सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. मात्र या एक्स्प्रेसमुळे प्रवासाचे तीन तास वाचणार आहेत. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास ५ ते ७ हजार प्रवासी शिक्षण, व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हे अंतर निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार असून, त्यामुळे ही फार मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
---------------
पावसाळी अधिवेशनात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. अधिवेशनातही यासंदर्भात आवाज उठविला होता. त्याला मान्यता मिळाल्याचे ऐकूण खूप समाधान वाटलं. नव्याने सुरू होत असलेली एक्स्प्रेस जानेवारीपासून सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होईल.
- खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर