Good News: १४ फेब्रुवारीपर्यंत होणार सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 05:55 PM2021-01-26T17:55:29+5:302021-01-26T17:55:53+5:30
सोलापूरचे काम समाधानकारक: ७३०० पैकी ६ हजार ५५ जणांना दिला डोस
सोलापूर: कोरोना लसीकरणाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यात आणखी ७ केंद्र वाढविण्यात आली आहेत. १८ केंद्रावर १८00 लसीकरणाचे उदिष्ठ असताना सोमवारी १ हजार ४५२ जणांनी लस घेतली आहे अशी माहिती जिल्ह्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी "लोकमत' शी बोलताना दिली.
१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात झाली. त्यानंतर १९, २0, २१ आणि २५ जानेवारी रोजी लसीकरण पार पडले आहे. सुरूवातीला ११ ठिकाणी दररोज ११00 जणांचे उदिष्ठ होते. सोलापूरचे काम समाधानकारक असल्याचे पाहून आरोग्य विभागाने ७ केंद्र वाढविण्यास परवानी दिली. त्यामुळे सोमवारी मंद्रुप, मोहोळ, माढा, वडाळा, पंढरपुरातील लाईफ लाईन हॉस्पीटल आणि सोलापुरात रेल्वे व मार्कंडेय रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.
आत्तापर्यंत ग्रामीणमधील ४ हजार ५६४ आणि शहरातील १ हजार ४९१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लसीकरणाला सुटी राहणार आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत लसीकरण संपविण्याचे उदिष्ठ असून, बुधवारी शहरात आणखी केंद्र वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले.
मंद्रूप येथे लसीकरण सुरू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे लसीकरणास सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी या केंद्राला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली.
लसीकरणानंतर मिळते प्रमाणपत्र
लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाºयांना पोर्टलवरून आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र दिले जात आहे. सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनीही लस घेतली. यावेळी डॉ. श्रेणिक शहा, दिलीप सिद्धापुरा, डॉ. खडतरे उपस्थित होते. लस सुरक्षित असून, नोंदणी केलेल्या सर्व कर्मचाºयांनी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.