आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:00 PM2020-06-22T12:00:20+5:302020-06-22T12:00:48+5:30

श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर वृक्षारोपण

Good news; Vitthalcharani resolve to plant 15 lakh trees in the state on Ashadi | आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

Next

पंढरपूर : यंदा कोरोनामुळे आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” या संत वचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या घरासमोर विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करुन श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिने अभिनेते व सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले.


सह्याद्री वनराई संस्था , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी (श्रीक्षेत्र आळंदी), श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान (श्रीक्षेत्र देहू) यांच्यातर्फे श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे , श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष ॲड. विकास ढगे-पाटील, श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, सोहळा प्रमुख अजित मोरे, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह गावोगावचे सरपंच , ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 


सिनेअभिनेते शिंदे म्हणाले , वारकऱ्यांना यंदा कोरोनामुळे आषाढी वारीला येता आले नाही याचे दु:ख आहे. हे दु:ख विसरायचे असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची उर्जा देतो. त्याची आपल्या दारात, शेतात, गावात लागवड करुन त्याची श्री पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा व जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला पाणी घाला. तो तुम्हाला आयुष्यभर जगण्याची उर्जा देईल. झाडे लावताना वड, पिंपळ, लिंब, चिंच, उंबर, आंबा, आवळा, जांभूळ याच देशी झाडांची लागवड करा, असे ते म्हणाले.


संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत नामदेव, माता रुक्मिणी, संत चांगावटेश्वर आदी संतांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या सुमारे १५ लाख वारकऱ्यांनी आपआपल्या गावी १५ लाख झाडे लावण्याचा विठ्ठल चरणी संकल्प केला असल्याचे हरीत वारीचे प्रणेते व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे यांनी सांगितले.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सुमारे ४५० दिंड्या आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्या गावी तर पालखी मुक्कामाच्या गावात पालखी तळावर वृक्ष लागवड करावी, असे आवाहन ॲड विकास ढगे-पाटील यांनी केले.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्या आहेत. या दिंडीकर्याना वृक्ष लागवडीसाठी संपर्क केला आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखांनी एकादशी दिवशीच वृक्ष लागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष मधूकर मोरे यांनी केले.

Web Title: Good news; Vitthalcharani resolve to plant 15 lakh trees in the state on Ashadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.