सोलापुरात ‘आर्द्रा’चा पूर्वार्धात चांगला पाऊस; पुनर्वसू नक्षत्राची मात्र मध्यम वृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:38 PM2021-06-21T12:38:07+5:302021-06-21T12:38:16+5:30
ओंकार दाते : उत्तरार्धात ‘पुष्य’ नक्षत्राची जोरदार बरसात
सोलापूर : आर्द्रा नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात चांगला पडणार असून, १ जुलैनंतर पर्जन्यमान कमी राहणार आहे. २६ ते ३० जून या कालावधीत या नक्षत्राचा पाऊस पडणार आहे. पुनर्वसूचा पाऊसही मध्यम असून, १० ते १५ जुलैपर्यंत या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली.
पुष्य नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात जोरदारपणे कोसळणार आहे. २३ ते २९ जुलैदरम्यान या पावसाची शक्यता आहे. याउलट आश्लेषा नक्षत्राचा पाऊस संमिश्र आहे. काही भागांत चांगली पर्यन्यवृष्टी होणार असल्याचे दाते यांनी सांगितले. ४ ते १२ ऑगस्टपर्यंत या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मघा नक्षत्राचा पाऊसही खूप समाधान देऊन जाणार आहे. या नक्षत्राचे जोरदार वारेही वाहतील.
२० ते २६ ऑगस्टपर्यंत या नक्षत्राचा पाऊस असणार आहे. पूर्वा नक्षत्राचा पाऊस ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत मध्यम त कमी प्रमाणात बरसणार आहे. २८ ते ३१ ऑक्टोबर हा कालावधी स्वाती नक्षत्राचा असला तरी फारसा पाऊस पडणार नसल्याचे ओंकार दाते यांनी सांगितले. हस्त नक्षत्राचा पाऊस बऱ्यापैकी होईल. खंडित वृष्टीचे योगही या नक्षत्रासाठी सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
‘उत्तरा’चा पाऊस पिकांना उपयुक्त
उत्तरा नक्षत्र यंदा शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस घेऊन येणार आहे. पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त असणार आहे. १६ ते २२ सप्टेंबरपर्यंत या पावसाचा योग असला तरी थोडी उष्णताही जाणवणार असल्याचा अंदाज पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी व्यक्त केला. चित्रा नक्षत्राचा पाऊसही समाधानकारक असून, १३ ते १९ ऑक्टोबरपर्यंत चित्राचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्षत्रं अन् प्रारंभ (कंसात वाहन)
रोहिणी - २५ मे, मृग -८ जून (गाढव), आर्द्रा- २१ जून (कोल्हा), पुनर्वसू- ५ जुलै (उंदीर), पुष्य- १९ जुलै (घोडा), आश्लेषा -२ ऑगस्ट (मोर), मघा-१६ ऑगस्ट (गाढव), पूर्वा -३० ऑगस्ट (बेडूक), उत्तरा- १३ सप्टेंबर (म्हैस), हस्त-२७ सप्टेंबर (घोडा), चित्रा- १० ऑक्टोबर (मोर), स्वाती- २३ ऑक्टोबर (गाढव).