गुड बोला़ गोड बोला ! ज्याचा जिभेवर ताबा त्याचा सर्वत्र दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:02 PM2019-01-16T13:02:44+5:302019-01-16T13:04:46+5:30
गोड बोलणाºयांचे लोखंड विकले जाईल पण कडू बोलणाºयांचे सोनेसुद्धा विकले जात नाही. व्यापार करताना गोड बोलले पाहिजे हा बिझनेस ...
गोड बोलणाºयांचे लोखंड विकले जाईल पण कडू बोलणाºयांचे सोनेसुद्धा विकले जात नाही. व्यापार करताना गोड बोलले पाहिजे हा बिझनेस मॅनेजमेंटचा संदेश आहे. तसंच दैनंदिन व्यवहाराचा, आचरणाचाही संदेश आहे. ‘ज्याचा जिभेवर ताबा.. त्याचा सगळीकडे दबदबा’ असेही म्हणावे लागेल. यासाठी गोड बोलून विचारांचे उड्डाणपूल बांधा मग बघा आयुष्याला सकारात्मक दृष्टीनं पहा. आयुष्य सुंदर होऊन जाईल.
गोड बोलण्याचे फायदे जास्त आहेत. एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही पण गोड बोलण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. गोड बोलायला मन मोठं असावं लागतं. समोरच्या व्यक्तीचे सगळे दोष झाकून त्याच्या फक्त चांगल्या गुणांचं कौतुक करायला फार मोठं मन मेंदूच्या देव्हाºयात असावं लागतं.
सध्या फ्लेक्झिबल’ वस्तूंचं युग आहे. पण परमेश्वरानं माणसाची निर्मिती करताना ‘फ्लेक्झिबल’ जीभ तोंडात ठेवून दिली आहे. वेगवेगळ्या पदार्थांची व वेगवेगळ्या शब्दांची चव जिभेला दान केलीय. पण पदार्थ खाण्याचा समतोल राखणं पोटाला, शब्दांचा समतोल राखण्याचं बुद्धीला महत्त्वाचं काम दिलेलं आहे.
पोटाला विचारुन खावं आणि बुद्धीला विचारुन बोलावं. जीभेवरचा ताबा सुटला तर पोटाला आणि बुद्धीला परिणाम भोगावे लागतात. खाण्यावरचा ताबा सुटला तर फक्त एकाच व्यक्तीला त्रास होतो पण बोलण्यावरचा ताबा सुटला तर नातीगोती, मित्र, समाज या सर्वांना त्रास होतो.
- प्रा. दीपक देशपांडे, हास्यसम्राट