गुगल डॉ२क्टर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:27 PM2019-01-29T14:27:57+5:302019-01-29T14:28:45+5:30
नेहमीप्रमाणे माझी सकाळची ओपीडी चालू होती. नेक्स्ट, मी पुढचा पेशंट ओपीडीत बोलविला. एक छान उंचापुरा रुबाबदार तरुण माझ्या समोरच्या ...
नेहमीप्रमाणे माझी सकाळची ओपीडी चालू होती. नेक्स्ट, मी पुढचा पेशंट ओपीडीत बोलविला. एक छान उंचापुरा रुबाबदार तरुण माझ्या समोरच्या खुर्चीत घेऊन बसला. मी नेहमीचाच प्रश्न विचारला ‘बोला, काय त्रास होतो आहे? ‘डॉक्टर, मला वेरीकोसिल झाले आहे.’ मी पुन्हा तोच प्रश्न विचारला ‘हो, पण त्रास काय होतो आहे?’ डॉक्टर, मला वेरीकोसिल झाले आहे.
‘मी परत तोच प्रश्न विचारला ‘पण नक्की त्रास काय होतो आहे?’ पुन्हा तेच उत्तर मिळाले ‘डॉक्टर, मला वेरीकोसिल झाले आहे. आता मात्र माझ्या लक्षात आले की प्रश्न विचारून काहीही फायदा नाही.मी त्या रुग्णाला तपासणीच्या टेबलवर झोपण्यास सांगितले. तपासल्यानंतर मला लक्षात आले की त्याचे निदान बरोबर होते. खरोखरच त्याला वेरीकोसिल नावाचा आजार झालेला होता. वृषणकोशातील पुरुष बिजांडाकडून अशुद्ध रक्त शरीराकडे नेणाºया रक्तवाहिन्या जेव्हा मोठ्या होतात त्यावेळी त्याला वेरीकोसिल असे म्हणतात.तपासणी टेबलवरून उतरून खुर्चीवर बसता बसता त्या रुग्णाने मला पुन्हा एकदा ऐकवले ‘बरोबर आहे ना डॉक्टर ! मला माहिती आहे, मला वेरिकोसिल झालेले आहे ते.
‘मी विचारले ‘यापूर्वी कोणत्या डॉक्टरांना दाखविले होते? ‘तर तो म्हणतो कसा’ छे, छे, तुम्हालाच पहिल्यांदा दाखवतो आहे. ‘मग तुमच्या आजाराचे इतके अचूक निदान कसे केले तुम्ही? गुगल आहे ना डॉक्टर! आणि मी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मग बरोबर आहे, मी खजिल होऊन बोललो. मग लगेचच त्याने पुढचा बॉम्ब टाकला. ‘डॉक्टर, मी आॅपरेशनला तयार आहे. ‘आता मात्र मला हसू फुटले. मी त्याची थोडीशी फिरकी घ्यायचे ठरविले. म्हटले, कसले आॅपरेशन? तर त्याने मला चक्क आॅपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती सांगायला सुरुवात केली. या आजारासाठी दुर्बिणीने म्हणजेच लॅपरोस्कोपिक सर्जरी करणे कसे चांगले असते हेही त्याने मला पटवून सांगितले आणि वर पावशेर म्हणून याच कारणासाठी तो माझ्याकडे आज आलेला आहे हेही त्याने मला ऐकविले. शेवटी त्याने असे जाहीर केले की लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी तो तयार आहे आणि मी ती करावी.
आता मात्र मला हसू कंट्रोल होत नव्हते. पण ते आवरून मी त्याला म्हणालो तुम्ही व्हेरिकोसिलचा चांगला अभ्यास केलेला दिसत नाही. हे ऐकून त्याला थोडासा राग आलेला दिसला. थोडेसे चिडूनच तो म्हणाला, डॉक्टर तुम्ही मला वेरिकोसिलसंदर्भात कोणतेही प्रश्न विचारू शकता आणि मी ती उत्तरे देऊ शकतो.मी त्याला म्हटले ‘पण तरीही मी तुझे आॅपरेशन करणार नाही.’ नाही डॉक्टर, बिलाची चिंता करू नका, माझा मेडिकल इन्शुरन्स आहे’अगदी अपेक्षित उत्तर आले.
‘मित्रा, तू व्हेरीकोसिलची लक्षणे, तपासण्या आणि उपचारांवर चांगला अभ्यास नक्कीच केलेला आहेस परंतु आॅपरेशन नक्की कोणत्या कारणासाठी करायला हवे असते याची माहिती तुला दिसत नाही.व्हेरीकोसिलमध्ये आजकाल आॅपरेशन फक्त एकाच कारणांसाठी केले जाते. ते म्हणजे वेदनांसाठी आणि वेदना तर तुला अजिबात नाहीत.’ पण डॉक्टर पुढे जाऊन मला मुले होणार नाहीत त्याचे काय? मी पुन्हा हसलो. मी त्याला सांगितले, पुरुष वंध्यत्व आणि वेरीकोसिल यांचा संबंध हा खरेतर संशयास्पद आहे आणि अजून तुझे लग्नही झालेले नाही तेव्हा वंध्यत्वासाठी फारतर एखादी तपासणी आपण करु यात. सिमेन? नालिसिस म्हणजेच वीर्य तपासणी ही एक साधी तपासणी करणे एवढेच काय ते मी तुला आत्ता सांगतो आहे. तेही तुझ्या समाधानासाठी.’
काही दिवसांनी पुन्हा वीर्य तपासणीचा रिपोर्ट घेऊन तो आला. अपेक्षेप्रमाणे तो नॉर्मल होता. पण तो आॅपरेशन करण्यावर ठाम होता.‘डॉक्टर, आत्ता आॅपरेशन करण्यास काय हरकत आहे? मला आजार आहे, मी आॅपरेशन करुन घ्यायला तयार आहे,माझा इन्शुरन्सही आहे, मग अडचण काय आहे? पुन्हा नंतर दुखले तर किंवा धातू कमी झाला तर? गॅरंटी काय? ‘मी त्याला विचारले, मी आता रस्त्यावर जाणार आहे. सांग बरे, मला आता अपघात होऊ शकतो किंवा नाही? देशील गॅरंटी अपघात न होण्याची? तो चपापला. ‘असे कसे सांगता येईल सर? ‘अरे, मग तुझ्या आजाराचेही असेच आहे! ‘पुन्हा एकदा मी त्याला त्याच्या आजाराबद्दल पूर्णपणे शास्त्रोक्त माहिती दिली. वेरिकोसिल हा आजार हा अनेक तरुणात आढळतो व त्यासाठी आॅपरेशनची गरज पडण्याचे प्रमाण त्या मानाने खूपच कमी आहे हे त्याला समजावून सांगितले. गुगल माहिती देईल पण अनुभव सर्जनचाच कामाला येईल हे पटवून दिले तेव्हा कुठे स्वारी खूश झाली.
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)