गोप्पदैना भाषा : तेनेकन्ना तीयनैनदी तेलुगू भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 08:05 PM2019-08-30T20:05:33+5:302019-08-30T20:06:26+5:30

तेलुगु भाषा दिन विशेष;  सोलापुरातील तेलुगू समाज बांधवांचा घेतलेला परामर्श

Gopaddina Language: Tennakana Tiyanadi Telugu language | गोप्पदैना भाषा : तेनेकन्ना तीयनैनदी तेलुगू भाषा

गोप्पदैना भाषा : तेनेकन्ना तीयनैनदी तेलुगू भाषा

Next
ठळक मुद्देमातृभाषा जरी तेलुगू असले तरी इथल्या मातीशी, संस्कृतीशी एकरुप झालेला तेलुगू भाषिक समाज शहरात मोठ्या प्रमाणावर आहे.गोप्पदैना भाषा तेनेकन्ना तीयनैनदी तेलुगु भाषा याचा अभिमान बाळगत घरातील व समाजबांधवांशी तेलुगू भाषेतून संवाद साधतात.

यशवंत सादूल 

सोलापूर : मातृभाषा जरी तेलुगू असले तरी इथल्या मातीशी, संस्कृतीशी एकरुप झालेला तेलुगू भाषिक समाज शहरात मोठ्या प्रमाणावर आहे.  गोप्पदैना भाषा तेनेकन्ना तीयनैनदी तेलुगु भाषा याचा अभिमान बाळगत घरातील व समाजबांधवांशी तेलुगू भाषेतून संवाद साधतात. या मंडळींची व्यवहारिक भाषा शिक्षण मराठी माध्यमातून होते.  आपल्या तेलुगू मातृभाषेतून घरात, समाजबांधवांशी संवाद साधणारा पद्मशाली समाज, नीलगार, वडार, मोची जवळपास पंधरा ते सोळा समाज शहरात मागील शंभर वर्षांपासून शहरात आहेत. तेलुगू भाषा दिनानिमित्त घेतलेला हा परामर्श...

कुरहिनशेट्टी समाज ...
सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी विणकामाच्या निमित्ताने आंध्र, तेलंगणातून सोलापुरात स्थायिक झालेला कुरहिनशेट्टी समाज शहराच्या पूर्व भागात वास्तव्यास आहे. नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन हे समाजाचे कुलदैवत आहे. सत्तर ते ऐंशी हजार लोकसंख्या असलेल्या या समाजाची मातृभाषा तेलुगू असून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तेलुगूतूनच संवाद साधतात. टेक्स्टाईल आणि ज्वेलरी उद्योगात बहुतांश समाज असून युवा पिढी मात्र अभियांत्रिकीमध्ये करिअर करीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. समाजाच्या वतीने शैक्षणिक संस्था चालविल्या जातात.

निलगार समाज...
आंध्र, कर्नाटक, तेलंगणा येथून ऐंशी वर्षांपूर्वी  विणकामास पूरक व्यवसाय असलेल्या सुतरंगणी कामानिमित्त हा समाज सोलापुरात स्थिरस्थावर झाला आहे. या समाजाची मातृभाषा संपूर्णत: तेलुगू आहे. कालिका माता या समाजाचे कुलदैवत असून पद्मशाली चौकातील मंदिरात शास्त्रीय पद्धतीने पूजा अर्चा होते. बहुतेक समाज बांधव टेक्स्टाईल उद्योजक असून युवा पिढी मात्र नोकरीत करिअर करत आहे. समाजाच्या वतीने नीलगार समाज शिक्षण संस्था कार्यरत असून सर्व समाजातील जवळपास हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दत्त नगर, गीता नगर, नीलम नगर, गवळी वस्ती, पाच्छा पेठ परिसरात समाजबांधव वास्तव्यास आहेत.

आर्य वैश्य कोमटी समाज...
सोलापुरात अत्यल्प बाराशे लोकसंख्या असलेला हा कोमटी समाज सधन आहे. त्यांची मातृभाषा तेलुगू़ सुमारे शंभर वर्षांपूर्वी कापडाच्या व्यापारानिमित्त सोलापुरात आले आणि पेशव्यांनी वसविलेल्या मंगळवार पेठ परिसरात वस्ती करून राहिले. वासवी कन्यकापरमेश्वरी या समाजाची कुलदेवता असून नगरेश्वर हे कुलदैवत आहे. सध्या समाज होटगी रोड, विजापूर रोड भागात विखुरलेला आहे. नवी पिढी मात्र नोकरी करीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. समाजात उच्च विद्याविभूषित विजय रघोजी, जयंत बच्चुवार हे डॉक्टर, भारत पारसवार हे सी ए़,राघवेंद्र सोमशेट्टी ते आर्किटेक्चर आहेत.

तोगटवीर क्षत्रिय समाज...
तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असलेला तोगटवीर समाज तेलुगूतूनच घरात आणि समाजबांधवांशी संवाद साधतात. आंध्र, तेलंगणातून सुमारे शंभर वर्षांपूर्वी विणकामाच्या निमित्ताने स्थायिक झाला. मंगळवार पेठ, उदगिरी गल्ली, साखर पेठ, रविवार पेठ, विडी घरकूल, अशोक चौक, भवानी पेठ परिसरात समाज बांधव वास्तव्यास आहेत. चौडेश्वरी देवी ही समाजाची कुलदैवता असून कन्ना चौकात भव्य मंदिर आहे. देवीचा ज्योती उत्सव हे सोलापूचे वैशिष्ट्य होय. समाजाच्या वतीने शिक्षण संस्था,पतसंस्था कार्यरत आहेत. समाजात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उद्योजक असून युवा पिढी आय़टी़ क्षेत्रात करिअर करत आहे.

नीलकंठ समाज ...
विणकर असलेला हा समाज रोजीरोटी निमित्ताने नव्वद वर्षांपूर्वी तेलंगणातून सोलापुरात आला. पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या या समाजाची मातृभाषा ही तेलुगूच आहे. नीलकंठेश्वर हे समाजाचे कुलदैवत असून घोंगडे वस्तीत मंदिर आहे. टेक्स्टाईल उद्योग, व्यवसायात समाज गुंतलेला आहे. बालाजी आबत्तीनी हे समाजातील पहिले सी. ए. आहेत. या छोट्याशा समाजाला मोठा राजकीय वारसा असून कै. माजी खासदार लिंगराज वल्याळ  व सध्याचे नगरसेवक नागेश वल्याळ नीलकंठ समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

टकारी समाज..
लिमयेवाडी, रामवाडी, सेटलमेंट परिसरात राहणारा हा तेलुगू बोलणारा समाज ऐंशी वर्षांपूर्वी आंध्रमधून स्थलांतरित होऊन सोलापुरात आला. पारंपरिक टाकणकार म्हणून ओळखला जाणारा हा समाज जात्यावर टाक्याचे घाव घालण्याचे काम करत असत. भटक्या विमुक्त असलेल्या या समाजाची कुलदैवत तुळजाभवानी शिलवंती माता असून उत्सव डामडौलात साजरा केला जातो.

पामलोर समाज...
साप खेळवणे,त्यातून मनोरंजन करून उदरनिर्वाह करणे हा या समाजाचा व्यवसाय.मातृभाषा मात्र तेलुगू. पुढे हा व्यवसाय बंद पडला पण हा समाज इतर रोजगार निर्माण करीत येथेच राहिला. हजार ते बाराशे लोकसंख्या असलेला हा समाज रामवाडी,लिमयेवाडी परिसरात राहत आहे.

Web Title: Gopaddina Language: Tennakana Tiyanadi Telugu language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.