गोवर-रुबेला लसीमुळे एकाचाही मृत्यू नाही; जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:54 PM2019-01-03T14:54:27+5:302019-01-03T14:56:55+5:30
सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज ...
सोलापूर : भारतात आजपर्यंत २० कोटी बालकांना गोवर-रुबेला लस दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लीम समाजात रुबेला लसीविषयी गैरसमज पसरविले जात आहेत. त्या अफवांवर मुस्लिम बांधवांनी विश्वास ठेवू नये, गोवर-रुबेला लसीमुळे आजवर एकाही बालकाचा मृत्यू झाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी स्पष्ट केले. या लसीमुळे ना मर्द व नपुंसकता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रुबेला लसीकरणाबाबत मुस्लीम समाज व डॉक्टरांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉक्टर उपस्थित होते.
शाळेत लस देणाºयांना तो मुलगा व मुलगी कोणत्या समाजाचा आहे हे माहिती नसते. हे मनातून काढून टाका, रुबेला लसीमुळे मुस्लीम समाजाला नामर्द, नपुंसकता असे गैरसमज पसरविले जात आहेत. शहरातील सर्वच शाळेत मुलांना लस देण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लीम शाळेत हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवत आहेत आणि आमचे मुस्लीम बांधव ते व्हिडिओ बघून मुलांना लस देण्याचे टाळत आहेत. हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर-रुबेला लसीमुळे कोणताही आजार होत नसल्याचे विविध पुरावे डॉ. सय्यद यांनी दाखविले.
मुलांना आजार असल्यास सांगा
- आपल्या मुलांना कोणता आजार किंवा इतर त्रास असल्यास लस देण्यापूर्वी पालकांनी त्याची कल्पना शिक्षकांना द्यावी. शिक्षक हे डॉक्टरला सांगतील. त्या प्रकारे त्याच्यावर उपचार केले जातील, असे डॉ. सय्यद म्हणाले. तसेच मुस्लीम बांधवांनी या लसची जनजागृती करुन सर्वांना लस द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्वतंत्र कक्ष सुरु
- लसीकरणानंतर काही बालकामध्ये ताप येणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी आढळून येऊ शकतात. त्यासाठी लसीकरण करणाºया आरोग्य सेविकांकडे आवश्यक औषधे व इंजेक्शन उपलब्ध करुन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे डॉ.व्ही.एम. मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल येथे सदर बालकासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
गोवर लसीचे फायदे
- बालकाला गोबर लस दिल्यास त्याचे आजारापासून संरक्षण होते. समाजामध्ये गोवर व रुबेला लस एकाचवेळी ठराविक वयोगटाला दिल्यास त्याचा सर्व समाजाला फायदा होणार आहे. सदृढ व सक्षम पिढी घडविण्यास मदत होते. जागतिक आरोग्य संघटनेने भारतामध्ये गोवर व रुबेला या दोन आजारांना २०२० पर्यंत हद्दपार करण्याचे ठरविले आहे. ही लस भारतातील कंपनीकडून उत्पादित करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी लस तयार होते, तेथे मुस्लीम समाजातील डॉक्टरांनी भेट देऊन प्रत्यक्ष खात्री केल्याचे ते म्हणाले.