मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:18 PM2019-04-23T13:18:15+5:302019-04-23T13:19:24+5:30
जेऊर येथील मतदान केंद्रावर नागराज मंजुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर : प्रख्यात निर्माता - दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. जेऊर ता. करमाळा हे नागराज मंजुळे यांचे मूळ गाव़ दुपारी त्यांनी बाराच्या सुमारास जेऊर येथील मतदान केंद्रावर नागराज मंजुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
चित्रपट, लघुपटाच्या माध्यमातून त्यांनी अभूतपूर्व यश मिळविले तरी गावाबद्दलची ‘नाळ’ तुटू दिलेली नाही हेच आज त्यांनी केलेल्या मतदानावरून दिसून आलं़ सकाळी पुण्याहून त्याचं जेऊर येथे आगमन झाल्यानंतर अनेकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं़ त्यांना पाहण्यासाठी जेऊरकरांनी व मतदानासाठी आलेल्या मतदारांनी एकच गर्दी केली होती़ प्रसिध्दीच्या शिखरावर असतानाही त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला.
फॅँड्री आणि सैराट चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. बीग बी अमिताभ बच्चनसोबत त्यांचा झूंड नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सातासमुद्रापार त्यांच्या यशाचा डंका वाजत असला त्यांनी आपल्या गावाशी नाळ तूटू दिलेली नाही. आपले मतदान त्यांनी जेऊर येथेच ठेवले आहे.
मतदान झाल्यानंतर काही हौशी मंडळींनी त्यांच्याकडं पाहत सैराटमधील ‘लागीरं झालं जी’ या चित्रपटातील गाण्याच्या धर्तीवर मतदान झालं जी़़़अशी आरोळी ठोकली.