‘शासन आपल्या दारी’: सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार लोकांनी काढले जातप्रमाणपत्र!
By संताजी शिंदे | Published: June 3, 2023 03:51 PM2023-06-03T15:51:24+5:302023-06-03T15:51:58+5:30
दरम्यान, लोकांनी सर्वांत जास्त ३८ हजार ३७३ लोकांनी जातप्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे.
सोलापूर : तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. विविध प्रकारच्या ३५ योजना असून, जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १ एक लाख २३ हजार २१२ लोकांना याचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, लोकांनी सर्वांत जास्त ३८ हजार ३७३ लोकांनी जातप्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर, मंद्रुप, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा तालुक्यांत उपक्रम सुरू आहे. उपक्रमाअंतर्गत सीमांत शेतकरी गट बांधणी, महाडीबीटी, शेती किट, बाजार किट, फवारणी किट, ई-श्रम कार्ड, स्वनिधी योजना, इमारत बांधकाम योजना, रेशनकार्ड, आयुष्यमान कार्ड, संजय गांधी व श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवास, जन्म-मृत्यू दाखला, अपघात विमा योजना, बचत गट, हेल्थ गट, गायी, म्हशी व शेळी मेंढी वाटप.
महिलांना शिलाई मशीन वाटप, विधवा, अपंग, दारिद्र्यरेषेखालील योजना, वीजजोडणी, माती परीक्षण, शिकावू चालक परवाना, दिव्यांग साहित्य वाटत, महिला सखी किट वाटप, मुलींना सायकल वाटप, मनरेगा, घरकुल योजना, विवाह नोंदणी, पी. एम. किसान माहिती दुरुस्ती, आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, शासकीय कर्मचारी आस्थापना विषयक प्रलंबित बाबी, कृषी सेवा केंद्रांचे परवाने आदी योजनांचा लाभ घेतला आहे. सर्वांत जास्त लाभ जातप्रमाणपत्राचा घेतला आहे. शासकीय कर्मचारी आस्थापनाविषयक प्रलंबित बाबी व सेवानिवृत्ती योजनेचा लाभ फक्त १२ लोकांनी घेतला आहे.
सहज मिळते माहिती, घेता येतो लाभ
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे लोकांना सहज माहिती मिळत आहे. जागेवर सर्व अधिकारी, कर्मचारी असल्याने गरजूंना योजनेसाठी अर्ज करता येत आहे. तत्काळ योजनेचा लाभही देण्यात येत आहे.