केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 03:57 PM2021-11-08T15:57:06+5:302021-11-08T15:57:37+5:30
पालखी मार्गाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील ऑनलाइन पद्धतीनं उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रानं राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार असल्याचं प्रतिपादन केलं.
"केंद्रानं राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी राहू देणार नाही. प्रत्येक पावलावरू तुमच्यासोबत राहू. यापूर्वी मी वारीचं स्वत: दर्शन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीचं हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली होती. विराट म्हणजे काय हे मला दिसलं होतं," असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
डोळ्यात मावत नव्हतं इतकं मोठं ते दर्शन होतं. वाखरी ते पंढरपूर हा मार्ग करण्याचा निर्णय घेतला गेला ही फार मोठी गोष्ट आहे. पालखीचा अनुभव मी पायी जात घेतला आहे. आपण वेगळ्या विश्वात राहतो, वारकरी समाज त्याच्या पलिकडे गेला आहे. देहभान हरपून जाणं हे काय असतं त्याचा अनुभव त्या ठिकाणी येतो. वारकरी संप्रदायानं आपल्याला खुप काही दिलं आहे. दिशा, संस्कृती दिली. प्रतिकुल कालखंडात अनेक शतके अनेक संकट झेलून वारकरी सांप्रदायानं आपली परंपरा कायम ठेवली. हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकार या कार्यात प्रत्येक पावलांवर सोबत राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलं.