शासनाचे आदेश; सोलापुरातील संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी ३ कोटी ६६ लाख रुपयाचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:40 PM2019-03-08T14:40:10+5:302019-03-08T14:43:01+5:30
सोलापूर : महापालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १२ कोटी २१ लाख १३ हजार रुपयांपैकी ...
सोलापूर : महापालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १२ कोटी २१ लाख १३ हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ३ कोटी ६६ लाख ३३ हजार ९०० रुपयांचे महापालिकेच्या खात्यावर वर्ग करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
केंद्राच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत संभाजी तलावातील गाळ शास्त्रीय पद्धतीने काढून तलाव परिसराचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया मनपाने काढल्या आहेत. गाळ काढण्याच्या कामासंदर्भातील निविदा निरी संस्था काढणार आहे.
या योजनेत केंद्र शासनाकडून ७ कोटी ३२ लाख ६८ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. महापालिकेचा हिस्सा ४ कोटी ८८ लाख ४५ हजार २०० रुपये असणार आहे. पर्यावरण विभागाने गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. यातील शासनाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयात हा निधी पोहोचल्यानंतर तो तत्काळ महापालिकेला अदा करण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम होणार आहे. सरोवर योजनेतून संभाजी तलावाचे रुपडे बदलणार आहे.
ही कामे होणार
- संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आराखडा तयार करून घेतला होता. यात तलावातील प्रदूषण भारांचे नियंत्रण करण्यात येईल. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया उभारण्यात येईल. जलपर्णी वाढीसाठी पोषक असलेले घटक कमी करणे, पाणथळ जागांची पद्धत निर्माण करणे, पावसाळी पाण्याचा निचरा करणे, जाळी लावणे, बांध मजबुतीकरण, सरोवर कुंपण, तटरेखा विकास आदी कामे करण्यात येणार आहेत.