सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी
By संताजी शिंदे | Published: April 29, 2023 02:17 PM2023-04-29T14:17:04+5:302023-04-29T14:58:58+5:30
"आंदोलकांवर केलेला बेछूट लाठीमार 'जनरल डायरला'ही लाजवणारा"
संताजी शिंदे, सोलापूर: बारसू रिफायनरी प्रकरणी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तो प्रकल्प रद्द करावा. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे सरकारने आगीशी खेळू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुट्टीवर पाठवून राज्य सरकारने आंदोलकावर केलेला बेछूट लाठीमार हा जनरल डायरलाही लाजवणारा आहे. हा अन्याय शेतकरी कधीही खपवून घेणार नाही. आतला-बाहेरचा असा शेतकऱ्यात भेदाभेद करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शनिवार ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवक अध्यक्ष विजय रणदिवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले की, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची नाळ ही शेती जोडली गेली आहे. त्यांचे वडील -भाऊ काळया आईची सेवा करतात. बारसू आंदोलनादरम्यान स्थानिक शेतकरी-महिलांवर निर्दयीपणे बेछूट लाटी हल्ला करताना शेतकरी पुत्र असणाऱ्या पोलिसांना मायेचा उमाळा कसा फुटला नाही ? असा प्रश्न उपस्थित केला.
स्थानिक व शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास बाहेरच्या लोकांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो .त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही छातीची ढाल करून अन्याय विरोधात शेतकऱ्याच्या बाजूने उभी असते. संकट समयी आम्ही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही. बारसू येथील शेतकरी चीन, अमेरिकेचा नाही. तेथील स्थानिकांच्या व शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले.