मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; मंदिर समितीने दिले निमंत्रण
By Appasaheb.patil | Published: July 5, 2022 03:25 PM2022-07-05T15:25:24+5:302022-07-05T15:26:32+5:30
एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.
सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्र्याचा सन्मान केला.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्रात अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या जोरावर कामाला लागले आहे. आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शासकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना वेग आला आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आमंत्रण देण्यासाठी पोहोचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा पार पडणार आहे.