गाजरं फुकट... सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचा असाही निषेध
By Appasaheb.patil | Published: March 10, 2023 01:22 PM2023-03-10T13:22:17+5:302023-03-10T13:24:57+5:30
यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या घोषणेने परिसरातील लाेकांचे लक्ष वेधून घेतले होते
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : महाराष्ट्रातील भाजप व शिंदे गटाच्या सरकारने गुरूवारी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ गाजरे दाखविणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. अर्थसंकल्पाचा निषेध करीत सोलापुरात ठाकरे गटाच्या नेत्यांनी शुक्रवारी सकाळी अनोखे आंदोलन करीत लोकांना फुकट गाजरांचे वाटप केले.
यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या घोषणेने परिसरातील लाेकांचे लक्ष वेधून घेतले होते. हलग्याही वाजविण्यात आल्या. यावेळी ठाकरे गटाचे पुरूषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, विठ्ठल वानकर, विष्णु कारमपुरी, अजय दासरी, संतोष केंगनाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस व शिंदे गटाने मांडलेला अर्थसंकल्प शब्दाची इमली करून मोठा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता या अर्थसंकल्पातून कामगार, शेतकरी, दलितांना, हाताला काम नाही, महागाई वाढलेली आहे, डिझेल, पेट्रोल वाढले, शेतीमालाला भाव नाही, जातीमध्ये विषमता दाखविणारा अर्थसंकल्प आहे. लोकांना स्वप्नांचे गाजर दाखविणारा हा अर्थसंकल्प असल्याची टिका पुरूषोत्तम बरडे यांनी केली आहे. कांदा, कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी सर्व शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात एकीकडे शेतकरी शेतमालाची होळी करत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ठोस अशी घोषणा करण्याची गरज असताना कुठलीही घोषणा करण्यात आलेली नसल्याचे विष्णु कारमपुरी यांनी सांगितले.