ग्रेन बेस डिस्टिलरी प्रकल्प; खराब धान्यापासून केली सॅनिटायझरची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:18 PM2020-08-06T14:18:41+5:302020-08-06T14:22:32+5:30
माळी शुगर ग्रेन बेस प्रकल्पातून सॅनिटायझर बनवणारा पहिला कारखाना
श्रीपूर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरीने खराब धान्यापासून अल्कोहोल काढून त्यापासून सॅनिटायझरची निर्मिती करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे, असे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने साखर उद्योगाला सॅनिटायझर उत्पादन करण्यास परवाने दिले. राज्यातील ११० साखर कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत. यापैकी ८० अल्कोहोल निर्मिती प्रकल्प यावर्षी सुरु होते. या साखर कारखानदारांनी सॅनिटायझर बनवण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली. ज्या कारखान्यांकडे अल्कोहोल निर्मिती प्रकल्प आहेत, त्यांनी सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये बारा डिस्टिलरींना परवानगी दिली आहे. यामध्ये ग्रेन बेस डिस्टिलरी माळीनगर येथील सासवड माळी शुगर फॅक्टरी एकमेव आहे. याठिकाणी खराब व काळे झालेल्या ज्वारी, मका, तांदूळ, बाजरी आदी धान्यांचा वापर करून अल्कोहोल तयार केले जाते. धान्यापासून बनवलेल्या सॅनिटायझरचा वास सौम्य असल्यामुळे त्यापासून निर्माण झालेले सॅनिटायझर उत्कृष्ट प्रतीचे तयार होत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सॅनिटायझरची निर्मिती केली गेली. साखर कारखान्यातून तयार होणारे सॅनिटायझर हे १०० मिलिलिटरपासून पाच लिटरपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. कारखान्याने प्रोटेक्ट प्लस या नावाने सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ग्रेन बेस एकमेव प्रकल्प
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव ग्रेन बेस डिस्टिलरी प्रकल्पातून धान्यापासून अल्कोहोल काढून त्यापासून सॅनिटायझरची निर्मिती केली जाते. राज्यामध्ये सांगली, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी धान्यापासून सॅनिटायझर तयार केले जाते.
हे सॅनिटायझर मोलॅसीसपासून अल्कोहोलचे नसून ग्रेन बेसपासून तयार केलेल्या अल्कोहोलचे आहे. या सॅनिटायझरमध्ये नियमानुसार सर्व घटकांचे मिश्रण केले असून ते निळ्या रंगात आहे. जिल्ह्यात पहिलाच साखर कारखाना आहे की, ग्रेन बेसपासून सॅनिटायझर उत्कृष्ट दर्जाचे तयार करत आहे.
- राजेंद्र गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर, माळी शुगर फॅक्टरी