मराठा आंदोलकांवरील लाठीहल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा
By दिपक दुपारगुडे | Published: September 7, 2023 05:49 PM2023-09-07T17:49:36+5:302023-09-07T17:49:54+5:30
जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत.
सोलापूर : जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व मराठा आरक्षणाला समर्थन देत करमाळा तालुक्यातील रोसेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य यशपाल गौतम कांबळे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
यशपाल कांबळे यांनी गुरुवार दि. ७ रोजी तहसीलदार व ग्रामसेवक यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. तरीपण प्रशासन मराठा समाजाला आरक्षण जाहीर करीत नाही. याचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. कित्येक मोर्चे निघाले पण त्यातून कोणताही मार्ग निघालेला दिसून येत नाही. मनोज जरांगे-पाटील हे आतासुध्दा उपोषण करीत आहेत. त्यांची शारिरीक परिस्थिती खराब होत चालली आहे, तरीही प्रशासन पावले उचलतांना दिसत नाही, यामुळे मी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.