गावातील आजी, माजी सैनिकांची घरपट्टी माफ, अनगर ग्रामपंचायतीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:55 AM2018-08-27T10:55:28+5:302018-08-27T11:00:19+5:30
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांची माहिती
अनगर : देशाच्या स्वातंत्र्यात आपले बलिदान दिलेले माजी सैनिक अन् सध्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आपले कर्तव्य बजावणाºया सैनिक कुटुंबाची घरपट्टी पूर्णत: माफ करताना ती घरपट्टी अनगर ग्रामपंचायत भरणार असल्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, १५ आॅगस्ट रोजी अनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अंकुश गुंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ग्ग्रामस्थांशी चर्चा करून अनेक ठराव संमत करण्यात आले. यात देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र डोंगराळ भागात, बर्फाळ भागात आई, वडील, पत्नी, बहीण, मुले यांच्यासह अन्य नातेवाईकांपासून दूर राहून सीमेवर आपली ड्यूटी बजावत असतात.
या जवानांच्या पराक्रमी कार्याचे कौतुक आणि त्यांना दिलासा मिळावा म्हणून आजी-माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या ग्रामसभेने घेतला आहे. यावेळी सरपंच अंकुश गुंड, शहाजी गुंड , भागवत शिंदे, रवींद्र पाचपुंड, बाबासाहेब मुलाणी, प्रकाश कुलकर्णी, अमर मुलाणी, तानाजी पाचपुंड, ग्रामविकास अधिकारी सचिन कदम, पैगंबर शेख, बापू ऐतवाडे, महेश टिंगरे, अमोल जाधव आदी उपस्थित होते़
ग्रामस्थांचे मोठे योगदान
- लोकनेते बाबुराव पाटील यांनी घालून दिलेल्या समतेच्या आदर्शावर आजतागायत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची बिनविरोधाची परंपरा अबाधित आहे तर माजी आमदार राजन पाटील व लोकनेते शुगरचे चेअरमन तथा जि. प. सदस्य बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत काटकसरीने कारभार करीत आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व शासनाच्या अनेक योजना राबवून जिल्ह्यात स्मार्टग्राम बनविण्यासाठी ग्रामस्थांचे योगदान मिळाल्याचे सरपंच अंकुश गुंड यांनी सांगितले.