नातवासोबत आजीची बाईक रायडिंग (कुजबुज)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:12+5:302021-06-21T04:16:12+5:30
लॉकडाऊन काळात कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाय करताना पोलिसांना रस्त्यावर येऊन कारवाई करावी लागली. कारवाईत पोलिसांना चकवा देण्यासाठी तरुणाई ...
लॉकडाऊन काळात कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाय करताना पोलिसांना रस्त्यावर येऊन कारवाई करावी लागली. कारवाईत पोलिसांना चकवा देण्यासाठी तरुणाई नामी शक्कल लढवताना दिसत होते. अनेकांनी दवाखान्याच्या चिठ्ठ्या, बाजाराच्या पिशव्या दाखवून सुटका केली. काही पठ्ठे चक्क शर्ट काढून शेतकरी वेशात प्रवास करीत. जेणेकरून तिथेच कुठेतरी जवळचे शेतकरी असल्याचा पोलिसांना भास होत असे. अशा नामी शक्कल लढवून लॉकडाऊन काळात रस्त्याने लहान लहान कामांच्या कारणाने फिरताना दिसत होते. माळशिरस शहराच्या हद्दीतील तरुणाने मात्र नामी शक्कल लढवली. यासाठी ७० वर्षांच्या आजीला बाईकवर बसवून आपली कामे करण्याचा दिनक्रम ठेवला होता. कारण आजीबाई पाठीमागे असल्यामुळे पोलीस सहानुभूतीपूर्वक दृष्टीने त्यांची गाडी अडवत नव्हते. अन् अडवले तेव्हा दवाखान्याचे कारण ठरलेले. नातवाच्या हट्टापायी आजी बाईकवर फिरायला नातवासोबत सज्ज असायची. नातवाने लढवलेल्या शक्कलीमुळे आजीची मात्र मोटारसायकल रायडिंग, नातवाला कामाचे व पोलिसांना माणुसकीचे समाधान झाले.