वाळूजमधील द्राक्षाची गोडी हैदराबाद, कोलकत्ताकरांच्या तोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:02 PM2020-04-02T12:02:36+5:302020-04-02T12:06:34+5:30
कादे कुटुंबाची यशोगाथा; तीन एकरांत घेतले ५० टन उत्पादन
संभाजी मोटे
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथील युवा दाम्पत्य शेतकरी आबासाहेब कादे आणि विद्या कादे यांनी तीन एकरांत सुपर सोनाका द्राक्षची लागवड करून तब्बल ५० टन उत्पादन घेतले़ ही द्राक्षे हैदराबाद आणि कोलकत्त्याच्या बाजारपेठेत पोहोचली आहेत.
वडिलांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत या जोडीने पाच वर्षांखाली तीन एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड केली. सुरूवातीला एप्रिल, मे महिन्यात बागेतील तण काढून बाग स्वच्छ केली. नंतर ट्रॅलीने शेणखत टाकून घेतले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेची छाटणी केली. त्यानंतर १५ दिवसांनी लहान घड दिसू लागले. घड मोठे होण्यासाठी जी. ए. या औषधाच्या फवारण्या केल्या. नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने दावण्या, भुरी, मिलिबग या रोगांचा बागेवर प्रादुर्भाव झाला. या रोगांना बाग बळी पडू नये म्हणून एम़ ४५ बाविस्टिन कर्जट या औषधाच्या ५० फवारण्या करून बाग गोडीला आणली. तीन एकर क्षेत्रात ३३०० झाडांची लागवड केली़ आठ बाय चार अंतरावर ही लागवड करुन ठिबक सिंचनाव्दारे बागेला पाणी दिले. बागेचे लोखंडी फाउंडेशन मांडव पध्दतीचे आहे. सर्व कामे आम्ही घरीच करतो. फक्त बागेची थिनिंग करण्यासाठी तासगावहून मजूर आणल़े.
शेतीमध्ये वडील सुखदेव कादे आणि आई शारदा कादे या मदत करतात. कादे कुटुंबाला २० एकर शेती आहे. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.
शेती करताना जिद्द आणि चिकाटी व नव्या तंत्राचा अवलंब केला की, यश हमखास मिळते. मात्र थोडासा धीर धरला पाहिजे, अशा शब्दांत आबासाहेब कादे यांनी आपले मनोगत मांडले़
१२० दिवसांनंतर बाग झाली गोड
- - रासायनिक खते, औषधे आणि मजुरांचा खर्च मिळून दोन लाख रुपये खर्च झाला़ दीड एकर बागेतील ५० रुपये दराने हैदराबाद आणि कोलकत्ता येथील व्यापाºयांनी हा माल उचलला़
- - कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे बाजारपेठ बंद आहे़ द्राक्षबागा तशाच राहिल्या. राहिलेल्या बागेचे बेदाणा बनविण्याचा विचार आहे. सरासरी ४० रुपये दर धरला तरी ५० टनाचे २० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागली नाही. वडिलांच्या पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन प्रयोग करावा म्हणून सुपर सोनाका द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला़ वाणाची निवड केली. प्रयोगशील शेतीमुळे आज भरघोस उत्पन्न मिळाले.
- आबासाहेब कादे
द्राक्ष उत्पादक, वाळूज, ता़मोहोळ